प्रतिनिधी/ कुडचडे
विश्व हिंदू परिषद, बजरंग दलातर्फे गीताजयंतीनिमित्त आज रविवार दि. 8 रोजी दुपारी 3.30 वा. सावर्डे येथून शौर्ययात्रा आयोजित करण्यात आली असून त्यानंतर संध्याकाळी कुडचडे-काकोडा नगरपालिका खुल्या मैदानावर विशाल शौर्यसभा होणार आहे. या यात्रा व सभेची तयारी जेरात चालू आहे. वातावरणनिर्मितीसाठी कुडचडे, सावर्डे, केपे तसेच अन्य ठिकाणी शौर्ययात्रेचे आमंत्रण फलक लावण्यात आले आहेत.
सदर शौर्यसभा संध्याकाळी 5 वा. होणार असून बजरंग दलाचे सावर्डेतील संकेत आर्सेकर त्याची जबाबदारी पेलत आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून गीताजयंती साजरी करण्यात येत आहे. पण यंदा देवाचीच इच्छा असावी म्हणून हे शौर्ययात्रेचे व शौर्यसभेचे बीज पेरले गेले असावे. श्रीकृष्णाने कुऊक्षेत्रात अर्जुनाला जी गीता सांगितली ती आजपर्यंत टिकून राहिली आहे. त्याची जाणीव कायम राहावी हाच यामागचा हेतू आहे. या शौर्यसभेसाठी आमच्या गटाने प्रत्येक गावात माहिती दिली असून जोरात तयारी सुरू आहे. सभेला उपस्थिती लावणाऱ्या प्रत्येक सेवकाची कोणतीच गैरसोय होऊ नये यादृष्टीने प्रयत्न चालला आहे, असे आर्सेकर यांनी सांगितले.
सभेला येणारे आपल्या गाड्या रवींद्र भवनसमोर अन्यथा कुडचडेतील सरकारी मैदानावर ठेऊ शकतात. तसेच दु. 3 वा. सावर्डे सरकारी प्राथमिक शाळेकडून सुरू होणारी शौर्ययात्रा कुडचडे गॅस सोसायटी, जुनी पालिका इमारत, पोलीस स्टेशनमार्गे शिवाजी महाराज सर्कल व तेथून डॉ. आंबेडकर सर्कलला वळसा घालून सभेच्या ठिकाणी येईल. नगरपालिकेच्या खुल्या मैदानावर ही यात्रा विसर्जित करण्यात येणार असून त्यानंतर सभा सुऊ होण्याअगोदर विधिवत आरती करण्यात येणार आहे. या सभेत बजरंग दलाच्या अडीच हजार युवा सदस्यांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी कित्येक रोमटामेळ सहभागी होणार आहेत. तसेच दुर्गावाहिनी गट, महिला योद्ध्या उपस्थित राहणार आहे. सर्वांनी या सभेला उपस्थिती लावावी, असे आवाहन आर्सेकर यांनी केले.









