केवळ कन्नड भाषेतून बैठकीची नोटीस : मराठी भाषिक नगरसेवकांतून नाराजी
बेळगाव : मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला असला तरी बेळगाव महानगरपालिकेत मात्र, मराठी भाषेवर अन्याय केला जात आहे. मराठी भाषिक नगरसेवकांना त्यांच्या भाषेत बैठकीची नोटीस देणे गरजेचे असताना केवळ कन्नड भाषेत नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे गुरुवार दि. 5 रोजी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मराठीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांकडून अधिकाऱ्यांना जाब विचारला जाणार आहे. त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावरून आजची सभा गाजणार आहे.
बेळगावात मराठीचे प्राबल्य असतानाही येथील मराठी भाषा आणि संस्कृती पुसून टाकण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत. व्यावसायिक आस्थापनांवर 60 टक्के कन्नड भाषेतील मजकूर लिहिणे जरुरीचे असल्याचा फतवा काढण्यात आला. याचा गैरफायदा घेत कन्नड संघटनांनी शहरातील व्यावसायिकांना अक्षरश: वेठीस धरले. बेळगाव महानगरपालिकेत मराठी भाषिक नगरसेवकांची संख्या अधिक आहे. मात्र, राष्ट्रीय पक्षातील नगरसेवकांकडून मराठीवर झालेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवला जात नाही. केवळ महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक रवी साळुंखे व त्यांचे सहकारी सातत्याने मराठीवरील अन्यायाविरोधात वाचा फोडत असतात.
आज महानगरपालिकेची सर्वसाधारण बैठक आयोजित करण्यात आली आहे. मात्र, बैठकीची नोटीस केवळ कन्नड भाषेतून देण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक आक्रमक बनले आहेत. याविरोधात सर्वसाधारण बैठकीत अधिकाऱ्यांना जाब विचारला जाणार असून सत्ताधारी गटातील मराठी नगरसेवक मराठीच्या बाजूने आवाज उठवणार की बघ्याची भूमिका घेणार, हे पाहावे लागणार आहे. मात्र बैठक मराठीच्या मुद्द्यावरून चांगलीच गाजणार आहे. यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक रवी साळुंखे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बैठकीच्या सुऊवातीलाच मराठीचा मुद्दा उचलून धरण्याचा निर्णय घेतला आहे.
कौन्सिल विभागाकडून बैठकीची तयारी
महापालिकेची सर्वसाधारण बैठक गुरुवार दि. 5 रोजी होणार आहे. त्यामुळे बैठकीची तयारी महापालिकेच्या कौन्सिल विभागाकडून करण्यात आली आहे. दि. 29 सप्टेंबर रोजी महापालिकेची सर्वसाधारण बैठक झाली होती. त्यानंतर दिवाळी सण व महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमुळे बैठक झाली नव्हती. दि. 28 नोव्हेंबर रोजी बैठकीचे आयोजन करण्यात येणार होते. पण बैठकीची नोटीस सात दिवस आधी मिळायला हवी, असा आग्रह विरोधी गटाने धरला. त्यामुळे 5 डिसेंबर रोजी बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. बैठकीच्या पार्श्वभूमीवर कौन्सिल विभागाकडून सर्व तयारी करण्यात आली आहे.









