विजयी संघ अंतिम फेरीत खेळणार, लढत रद्द झाल्यास लंकेला संधी
वृत्तसंस्था/ कोलंबो
दुखापतीने त्रस्त असलेल्या पाकिस्तानसमोर आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी आज गुरुवारी येथे होणार असलेल्या सुपर फोर स्तरावरील सामन्यात श्रीलंकेला रोखण्याचे कठीण काम असेल. पाकिस्तान आणि श्रीलंकेचे दोन गुण झाले आहेत आणि या सामन्यातील विजेता 17 सप्टेंबर रोजी होणार असलेल्या अंतिम फेरीत प्रवेश करेल. त्यामुळे या सामन्याला उपांत्य फेरीतील सामन्याप्रमाणे स्वरुप आले आहे.

मंगळवारी झालेल्या सुपर फोर सामन्यात भारताने श्रीलंकेचा 41 धावांनी पराभव करून अंतिम लढतीतील स्थान आधीच निश्चित केले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ चार गुणांसह गुणतालिकेत आघाडीवर आहे. तथापि, लंकेविरुद्धच्या या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी पाकिस्तानला काही चिंता सतावू लागल्या आहेत. ते वेगवान गोलंदाज हरिस रौफ आणि नसिम शाह यांना खेळवू शकणार नाहीत असे सध्याची परिस्थिती पाहता वाटत आहे. त्यांच्याबाबत दुखापतींमुळे शंका आहे. पाकिस्तानने आशिया चषक स्पर्धेच्या उर्वरित सामन्यांत ही कसर भरून काढण्यासाटी शाहनवाझ दहानी आणि ताशी 150 किलोमीटर वेगाने गोलंदाजी करू शकणारा 22 वर्षीय झमान खान यांना जोडले आहे.
याशिवाय फलंदाजीत नेपाळविरु द्धची 6 बाद 342 धावसंख्या वगळता पाकिस्तानला या स्पर्धेत अद्याप क्षमतेनुरुप चमक दाखविता आलेली नाही. मोठ्या धावसंख्येसाठी ते त्यांचे सलामीवीर फखर झमान आणि इमाम-उल-हक तसेच कर्णधार बाबर आझमवर अवलंबून आहेत. याशिवाय मोहम्मद रिझवान व सलमान आगा यांनीही योगदान देण्याची त्यांना आत्यंतिक गरज आहे. इफ्तिखार अहमदने नेपाळविरुद्ध धडाकेबाज शतक झळकावून आपली फटकेबाजीची क्षमता दाखविलेली असली, तरी अधिक चांगल्या प्रतिपक्षांविरुद्ध सातत्याने त्याने अशी कामगिरी करून दाखविणे गरजेचे आहे.

साखळी सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेचा सात गडी राखून पराभव केला होता, पण म्हणून ते गाफील राहू शकणार नाहीत. बांगलादेशला पराभूत करताना आणि भारतावरचा ताण वाढवताना दासुन शानाकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेने काही अव्वल खेळाडू नसतानाही आपले आव्हान पेलणे सोपे नाही हे दाखवून दिलेले आहे. श्रीलंकेलाही दुखापतींचा मोठा फटका बसलेला आहे. कारण वानिंदू हसरंगा, दुष्मंथा चमीरा आणि लाहिरू कुमारा यासारखे त्यांचे प्रमुख खेळाडू बाहेर पडले आहेत. यामुळे त्यांना फारसा अनुभव नसलेल्या तऊण संघाला मैदानात उतरविणे भाग पडले आहे. परंतु ड्युनिथ वेललागे, मथीशा पाथिराना आणि महेश थेक्षाना या खेळाडूंनी स्पर्धेत काही प्रभावी प्रयत्नांचे दर्शन घडविलेले आहे.
श्रीलंकेला त्यांच्या वेगवान गोलंदाजांकडून विशेषत: कसून राजिताकडून अधिक प्रभावी व सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा असेल. त्याने चार सामन्यांत चार बळी घेतलेले असले, तरी सर्व सामन्यांमध्ये षटकामागे सुमारे सहा धावा दिलेल्या आहेत. त्यामुळे यजमान संघाचे व्यवस्थापन त्यांचे फिरकीपटू पुन्हा एकदा कमाल दाखवतील अशी आशा बाळगून असेल. भारताविरुद्ध फिरकीस पोषक खेळपट्टीवर त्यांनी अप्रतिम कामगिरी करून दाखविली आणि त्यात डावखुरा फिरकीपटू वेललागे याने पाच बळी घेतले. डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीच्या नेतृत्वाखालील पाकच्या वेगवान माऱ्याची धार बोथट बनविण्याकरिता आजही अशीच खेळपट्टी उपलब्ध केली जाऊ शकते.
संघ : पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर झमान, इमाम-उल-हक, सलमान अली आगा, इफ्तिकार अहमद, मोहम्मद रिझवान, मोहम्मद हारिस, शादाब खान, मोहम्मद नवाज, उसामा मीर, फहीम अश्रफ, हरिस रौफ, मोहम्मद वसिम ज्युनियर, नसिम शाह, शाहीन आफ्रिदी, सौद शकील, तय्यब ताहिर राखीव). शाहनवाज दहनी, झमान खान (जखमी हरिस रौफ आणि नसिम शाह यांच्या बदल्यात).
श्रीलंका : दासुन शनाका (कर्णधार), पाथुम निस्सानाका, दिमुथ करुणारत्ने, कुसल जेनिथ पेरेरा, कुसल मेंडिस, चारिथ असलंका, धनंजय डिसिल्वा, सदीरा









