महाराष्ट्र एकीकरण समितीकडून बैठकीचे आयोजन
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीकडून शनिवार दि. 15 रोजी बेळगाव दक्षिणची उमेदवारी जाहीर केली जाणार आहे. सायंकाळी 4 वा. खानापूर रोड येथील मराठा मंदिर येथे निवड कमिटीची बैठक होणार आहे. प्राथमिक चर्चा झाल्यानंतर जनमताचा कौल व निवड कमिटीच्या सदस्यांकडून उमेदवाराची निवड केली जाणार आहे. बेळगाव दक्षिण मतदारसंघात म. ए. समितीकडून कोणाला उमेदवारी देण्यात येणार, यासंदर्भात चर्चा रंगत आहेत. सर्वच इच्छुक उमेदवार तगडे असल्याने त्यातून एकाची निवड करताना निवड कमिटीचीही दमछाक होत आहे. सर्व उमेदवारांच्या बुधवारी मुलाखती झाल्यानंतर गुरुवार व शुक्रवार दक्षिण मतदारसंघात जनमताचा कौल जाणून घेण्यात आला. लोकांना सीमाप्रश्न व योग्य उमेदवार कोणता वाटतो यासंदर्भात चाचपणी करण्यात आली. बैठक घेण्यासाठी गुरुवारी निवडणूक अधिकाऱ्यांकडे परवानगी मागण्यात आली होती. परंतु ती लवकर न मिळाल्याने शुक्रवारी बैठक होऊ शकली नाही. बेळगाव उत्तर, ग्रामीण व खानापूर येथील उमेदवार जाहीर झाले असल्याने दक्षिणची उमेदवारी केव्हा जाहीर होणार? हा प्रश्न विचारला जात आहे. उमेदवारी लवकर जाहीर झाल्यास उमेदवाराला प्रचारासाठी वेळ मिळणार आहे. शनिवारी सायंकाळी 4 वा. निवड कमिटीची बैठक बोलाविण्यात आली असून यावेळी सारासार विचार केला जाणार आहे. त्यानंतर उमेदवाराची निवड होणार आहे. राष्ट्रीय पक्षांनी यापूर्वीच आपले उमेदवार जाहीर केले असले तरी सर्वांच्या नजरा म. ए. समितीच्या उमेदवारांवर आहेत. त्यामुळे शनिवारी सायंकाळनंतर हे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.









