हनुमाननगर-कुवेंपूनगरात ब्लॅकआऊटसह प्रात्यक्षिकांचे सादरीकरण
प्रतिनिधी/ बेळगाव
रात्री 8 ते 8.15 या पंधरा मिनिटांसाठी संपूर्ण विभागात अंधार असणार आहे. यासंबंधी मनपा आयुक्त व हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनीही पत्रकांद्वारे माहिती दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि. 14 मे रोजी झालेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. युद्धाची स्थिती निर्माण झाल्यास, आग दुर्घटना घडल्यास परिस्थिती कशी हाताळावी, भयभीत न होता प्रसंगाला कसे सामोरे जावे, याची प्रात्यक्षिके दाखविण्यात येणार आहेत.
हेस्कॉमच्या कार्यकारी अभियंत्यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. हनुमाननगर व कुवेंपूनगर परिसरात साडेतीन हजार घरे आहेत. 151 व्यावसायिक आस्थापने आहेत. याबरोबरच पालकमंत्री व महिला-बालकल्याण खात्याच्या मंत्र्यांची घरे याच परिसरात आहेत. रविवारी रात्री 8 वाजता ब्लॅकआऊट करण्यात येणार आहे. नागरिकांनी तत्पूर्वी पाच मिनिटे आधी इन्व्हर्टर व एमसीबी स्वत:च बंद करण्याचे आवाहन केले आहे.भारत व पाकिस्तान दरम्यान पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीसप्रमुखांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेतली होती. बेळगावसह राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी मॉक ड्रिल व ब्लॅकआऊट करून प्रात्यक्षिके दाखवण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली होती.
शुक्रवार व शनिवारी हिंडाल्को व कणगला येथे मॉक ड्रिल करण्यात आले. आता रविवारी ब्लॅकआऊट करून आणीबाणीच्या प्रसंगी परिस्थितीचा सामना कसा करावा, याविषयी नागरिकांना माहिती देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे.









