वृत्तसंस्था/ ब्लोमफौंटन
येथे सुरू असलेल्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या आयसीसीच्या पुरुषांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी भारताचा सामना अमेरिका संघाबरोबर होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.30 वाजता प्रारंभ होईल.
या स्पर्धेत भारताने आतापर्यंत आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. भारतीय युवा संघाने पहिल्या सामन्यात बांगलादेशचा तर त्यानंतर दुसऱ्या सामन्यात आयर्लंडचा पराभव करून आपल्या गटातून आघाडीचे स्थान मिळविले आहे. रविवारी होणाऱ्या सामन्यात अमेरिकेचा संघ चांगली कामगिरी करण्यासाठी झगडत आहे. अमेरिकन संघाला या स्पर्धेत यापूर्वीच्या दोन्ही सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. आयर्लंड आणि बांगलादेश संघाकडून त्यांचा पराभव झाला आहे. उदय सेहरानच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची फलंदाजी आतापर्यंतच्या दोन सामन्यात समाधानकारक झाली आहे. पण बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारतीय फलंदाजांवर थोडे अधिक दडपण आल्याचे जाणवले.
भारतीय संघाने या स्पर्धेत यापूर्वीच सुपर सिक्स गटातील आपले स्थान निश्चित केले आहे. भारतीय युवा संघाने आतापर्यंत विक्रमी पाचवेळा आयसीसीच्या 19 वर्षाखालील वयोगटातील विश्वचषक स्पर्धेतील अजिंक्यपद मिळविले आहे. आतापर्यंत भारतीय संघाची आगेकुच समाधानकारक झाली आहे. या स्पर्धेत अ, ब, क आणि ड असे चार गट असून प्रत्येक गटात चार संघांचा समावेश आहे. प्रत्येक गटातील पहिले तीन संघ सुपर सिक्स फेरीसाठी पात्र ठरतील. भारतीय संघातील डावखुरा वेगवान गोलंदाज नमन तिवारी तसेच फिरकी गोलंदाज सौम्या पांडे यांची कामगिरी पहिल्या दोन सामन्यात प्रभावी झाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा मुशीर खानने आयर्लंडविरुद्ध शानदार शतक झळकवले. सलामीचा फलंदाज अरशीन कुलकर्णी रविवारच्या सामन्यात मोठी खेळी करण्यासाठी प्रयत्न करेल. पहिल्या दोन सामन्यात त्याला अनुक्रमे 7 आणि 32 धावा जमवता आल्या होत्या. कर्णधार सेहरनने पहिल्या दोन सामन्यात अर्धशतके झळकवली असून तो दुबळ्या अमेरिकाविरुद्ध पुन्हा अर्धशतक झळकवण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय संघातील सचिन धास हा फिनिशर म्हणून ओळखला जातो. या सामन्यात विजय मिळविण्यासाठी अमेरिकन संघाला फलंदाजी आणि गोलंदाजीतही दर्जेदार कामगिरी करावी लागेल. मात्र, पहिल्या दोन सामन्यात त्यांची फलंदाजी कमकुवत असल्याचे दिसून आले.









