आजराप्रतिनिधी
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 28 जुलै रोजी आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी मतदारसंघात संपर्क सुरू केला होता. मात्र नव्या सरकारने याबाबत बुधवारी 2017 च्या रचनेनुसार निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी इच्छुक असलेल्या मंडळींची घालमेल वाढली आहे.
आजरा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर 2017 मध्ये झाले. त्यानंतर आजरा शहर वगळून जिल्हा परिषद व पंचायत समितीची होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायतीच्या नव्या गट आणि गणांची रचना होताना ती कशी होणार, पूर्ववत तीन गट व सहा गण राहणार की दोन गट आणि चार गण अशी स्थिती होणार काय अशी चर्चा झाली होती. मात्र जिल्ह्य़ात वाढलेल्या जि. प. व पं. स.च्या जागांनंतर आजऱयातील तीन गट व सहा गण कायम राहणार हे स्पष्ट झाले. त्यानंतर आजरा ऐवजी पेरणोली हा नवा गट व या गटातील पेरणोली तसेच कासार कांडगांव हा नवा गण अस्तित्वात आला.
उत्तूर जिल्हा परिषद व या गटातील दोन्ही उत्तूर व भादवण हे दोन्ही गण जैसे थे राहीले. तर आजरा शहर वगळल्याने जुन्या आजरा व कोळिंद्रे गट व त्या अंतर्गत असलेल्या गणांची रचना नव्याने करण्यात आली. त्यामध्ये काही गावांची अदलाबदल झाल्याने प्रस्थापित तसेच नव्या इच्छुकांना नव्याने समीकरणे जमवावी लागणार आहेत. आरक्षण निश्चिती झाल्यानंतर इच्छुकांनी त्या अनुषंगाने हालचाली सुरू केल्या होत्या. राजकीय पक्ष आणि तालुक्याच्या राजकारणात सक्रीय असलेले गटांच्या नेत्यांनी चाचपणी सुरू केली होती. मात्र शासनाच्या बुधवारच्या निर्णयाने पुन्हा नव्याने आरक्षण काढण्याची शक्यता निर्माण झाल्याने आरक्षण बदलल्यास पुन्हा राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
जि. प. गट व पं. स. गणासाठी 28 रोजी पडलेले आरक्षणामध्ये उत्तूर गट नागरीकांच्या मागस प्रवर्गासाठी, नवा पेरणोली गट सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी तर नवा वाटंगी गट सर्वसाधारण झाला होता. तर उत्तूरमधील उत्तूर गण अनुसुचित जाती, भादवण सर्वसाधारण महिला, पेरणोली सर्वसाधारण, कासार कांडगांव सर्वसाधारण महिला, वाटंगी गण नागरीकांचा मागास प्रवर्ग तर गजरगांव गण सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित करण्यात आला होता. राज्य शासनाच्या नव्या निर्णयामुळे तालुक्यातील गट आणि गणात बदल होण्याची शक्यता कमी असली तरी जिल्हा परिषद गटातील आरक्षण बदलण्याची शक्यता असल्याने इच्छुकांची घालमेल वाढली आहे.