इंग्लिश महिला संघाविरुद्ध आज शेवटची वनडे, भारताने यापूर्वीच मालिका जिंकली असल्याने लढत औपचारिक
लंडन / वृत्तसंस्था
महिला क्रिकेटला ‘जलदगती गोलंदाजी’चे दालन उघडून देणारी भारताची अनुभवी महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामी आज आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा सामना खेळणार आहे. भारत-इंग्लंड महिला संघ तिसऱया व शेवटच्या वनडेत ऐतिहासिक लॉर्ड्सवर आमनेसामने उभे ठाकत असताना झुलन गोस्वामी यात मुख्य आकर्षण पेंद्र असेल. भारताने 3 सामन्यांची ही मालिका यापूर्वीच 2-0 अशा फरकाने जिंकली असल्याने आजची लढत औपचारिक स्वरुपाची असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार, या लढतीला दुपारी 3.30 वाजता सुरुवात होणार आहे.
एरवी, लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर शतक झळकावणे किंवा डावात 5 बळी घेणे देखील सन्मानाचे असते. मात्र, आपल्या कारकिर्दीची सांगता या ऐतिहासिक मैदानावर व्हावा, हा सन्मान प्रत्येक खेळाडूच्या वाटय़ाला येत नाही. त्या निकषावर झुलन गोस्वामी सुदैवी ठरणार आहे. अगदी, सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा किंवा ग्लेन मॅकग्रासारख्या दिग्गज खेळाडूंच्या वाटय़ालाही हा सन्मान आला नाही. अगदी जवळपास 20 वर्षे झुलनची संघसहकारी असणारी मिताली राज देखील हा मानमरातब मिळवू शकली नाही. झुलनला मात्र एमसीसी सूटच्या लाँगरुममधून शेवटची लढत खेळण्यासाठी उतरण्याची संधी मिळणार आहे. ती आज मैदानात उतरेल, त्यावेळी संघसहकारी दुतर्फा उभे राहून तिला गार्ड ऑफ ऑनर देतील.

भारतीय महिला संघाने ही मालिका यापूर्वीच 2-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकली असल्याने कर्णधार हरमनप्रीत कौर व सहकारी खेळाडूंना खेळाचा आनंद लुटता येईल. याचवेळी सलग तिसरा विजय मिळवत झुलनच्या कारकिर्दीची यथोचित, विजयी सांगता करण्याचा संघाचा प्रयत्न असणार आहे.
यापूर्वी, टी-20 मालिकेत दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय महिला संघाने वनडे मालिकेत मात्र उत्तम वरचष्मा गाजवला आणि पहिल्या दोन लढती जिंकल्यानंतर आता तिसऱया व शेवटच्या लढतीतही तीच घोडदौड कायम राखण्याचा संघाचा प्रयत्न असणार आहे. हरमनप्रीत कौरला ‘फ्री-फ्लोईंग’ फटकेबाजी साकारता आली, हे भारतासाठी सुचिन्ह ठरले आहे. तिने मागील दोन लढतीत अनुक्रमे नाबाद 74 व नाबाद 143 धावांचे योगदान दिले आहे. शफाली वर्मा मात्र पूर्ण दौऱयात खराब फॉर्ममध्ये असून हीच भारतीय थिंक टँकसाठी मुख्य चिंता राहिली आहे.
हरलीन देओल मध्यफळीतील विश्वासार्ह फलंदाज आहे. मात्र, झुलन निवृत्त झाल्यानंतर गोलंदाजीच्या आघाडीवर, मेघना सिंग, रेणुका ठाकुर, पूजा वस्त्रकार यांना अधिक जबाबदारी घ्यावी लागेल, हे स्पष्ट आहे. दुसरीकडे, यजमान इंग्लिश संघात कर्णधार हिदर नाईट व स्टार अष्टपैलू नॅट स्कीव्हर समाविष्ट नसल्याने त्यांना याचा फटका बसत आला आहे.
प्रतिस्पर्धी संघ
भारतीय महिला ः हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, सब्बिनेनी मेघना, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), पूजा वस्त्रकार, स्नेह राणा, रेणुका ठाकुर, मेघना सिंग, राजेश्वरी गायकवाड, हरलीन देओल, दयालन हेमलता, सिमरन दिल बहादूर, झुलन गोस्वामी, तानिया भाटिया, जेमिमा रॉड्रिग्ज.
इंग्लंड ः ऍमी जोन्स (कर्णधार व यष्टीरक्षक), टॅमी ब्यूमाँट, लॉरेन बेल, माईया बॉशियर, ऍलाईस कॅप्से, केट क्रॉस, प्रेया डेव्हिस, ऍलाईस डेव्हिडसन-रिचर्ड्स, चार्ली डीन, सोफिया डंकली, सोफी इक्लेस्टोन, प्रेया केम्प, इस्सी वाँग, डॅनी वॅट.
सामन्याची भारतीय प्रमाणवेळ ः दुपारी 3.30 वा.
वर्ल्डकप जिंकता आला नाही, ही झुलन गोस्वामीची खंत!

दोन दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत बरेच यश मिळवले असले तरी वनडे वर्ल्डकप जिंकता आला नाही, याची आपल्याला खंत वाटते, असे झुलन गोस्वामीने म्हटले आहे. झुलन गोस्वामी आज इंग्लंडविरुद्ध तिसरी व शेवटची वनडे खेळल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. या पार्श्वभूमीवर तिने सामन्याच्या पूर्वसंध्येला माध्यमांशी संवाद साधला.
झुलू दी, या टोपण नावाने ओळखली जाणारी झुलन संघात असताना भारताने 2005 व 2017 वर्ल्डकप फायनलपर्यंत धडक मारली. पण, दोन्ही वेळा जेतेपदाने हुलकावणी दिली.
‘क्रिकेटने ‘नेम-फेम’ दिले असल्याने मी त्याप्रती कृतज्ञ आहे. मात्र, प्रत्येक चार वर्षांनी खेळवल्या जाणाऱया विश्वचषक स्पर्धेवर मोहोर उमटवता आली नाही, त्याची खंत वाटते. वर्ल्डकप जिंकणे हा कोणत्याही खेळाडूसाठी स्वप्नपूर्तीचा क्षण असतो. त्यासाठी बरीच मेहनतही करावी लागते. इतका अपवाद वगळता मी सातत्यपूर्ण खेळू शकले, याचा अभिमान वाटतो. साधारणपणे दोन दशके खेळता येईल, अशी मी कधी कल्पनाही केली नव्हती. चकदाह (पश्चिम बंगालमधील नादिया जिल्हय़ातील खेडे) या छोटय़ाशा ठिकाणाहून इथवर पोहोचणे सोपे अजिबात नव्हते’, याचा तिने पुढे उल्लेख केला.
‘पदार्पणाच्या वनडे लढतीत भारतीय संघाची कॅप प्रदान करण्यात आली, तो क्षण माझ्यासाठी आजही तितकाच सर्वोत्तम आहे. भारतीय संघातर्फे खेळणे हे माझे स्वप्न होते आणि ते त्यावेळी फळाला आले होते. सरावासाठी मी रोज लोकल रेल्वेने अडीच तास प्रवास करत असे. त्यामुळे, ती एकंदरीत वाटचाल बरीच कठीण होती. 1997 मध्ये ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यात ईडन गार्डन्सवर झालेल्या वर्ल्डकप फायनलमध्ये बॉलगर्ल म्हणून जबाबदारी पार पाडली, त्याचवेळी भारतीय संघातून खेळण्याचे ध्येय मी निश्चित केले होते’, असे झुलन शेवटी म्हणाली.
झुलनचे पदार्पण ते आजचा शेवटचा सामना…नेमके काय बदलले?
भारतीय महिला संघाने 1999 मध्ये इंग्लिश भूमीत शेवटची वनडे मालिका जिंकली, त्यावेळी गोस्वामीने अद्याप आंतरराष्ट्रीय पदार्पण केले नव्हते. पण, हीच झुलन गोस्वामी आज आपल्या 204 व्या व शेवटच्या सामन्यात खेळणार आहे.
झुलनचा प्रवास बराच खडतर राहिला असून पहिल्या लोकल ट्रेनने ती कोलकात्यात पोहोचायची व उत्तर कोलकात्यातील श्रद्धानंद पार्कवर तिचा सराव सुरु होत असे. अगदी भारतीय संघातर्फे पदार्पण केल्यानंतरही सराव करुन परतत असताना ती ओपन व्हॅन रिक्षाने प्रवास करायची.
झुलनने भारतातर्फे पहिला सामना खेळला, त्यावेळी शफाली वर्मा व रिचा घोष या सध्याच्या संघसहकाऱयांचा जन्मही झाला नव्हता तर जेमिमा रॉड्रिग्ज अगदीच लहान होती. हरमनप्रीत देखील शालेय स्तरावर होती. आता झुलन गोस्वामी निवृत्त होत असताना हरमनप्रीत तिची कर्णधार आहे तर शफाली, रिचा, जेमिमा संघसहकारी आहेत. महिलांसाठी आयपीएल बाळसे धरत असताना आज जवळपास प्रत्येक महिला क्रिकेटपटूकडे सेंट्रल कॉन्ट्रक्ट्स आहेत. शिवाय, मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, ऑडी त्यांच्या दिमतीला आहेत. झुलनने पदार्पण केले, त्यावेळी मात्र रेल्वेने सेकंड क्लासचा प्रवास, डॉर्मिटरीत दाटीवाटीने राहणे व कॉमन वॉशरुम्स हे नेहमीचे होते. आता प्रवाहाखालून बरेच पाणी वाहून गेले असताना झुलनसमोर या सर्व आठवणी तरळून गेल्या तर ते साहजिकच आहे.









