पणजीसह सर्वत्र विशेष योग शिबिरांचे आयोजन
प्रतिनिधी /पणजी
दरवर्षी 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा ‘माणुसकीसाठी योगा’ ही थीम असून आपल्या जीवनात योगाच्या महत्त्वावर भर देण्यात येईल. यंदाचा योग दिन क्रीडा खाते व शिक्षण खात्याच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात येणार आहे. तसेच आझादी का अमृतमहोत्सवअंतर्गत हा योग दिन होईल. राज्यस्तरावरील योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयुष मंत्रालय व आरोग्य खात्यातर्फे बांबोळी येथील श्यामाप्रसाद इन्डोअर स्टेडियम येथे सकाळी 6.30 वा. आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची उपस्थिती असेल अशी माहिती आरोग्य सचिवांनी पत्रकार परिषदेत दिली.
तालुकास्तरीय कार्यक्रमांचे आयोजन
अकरा तालुक्यातील पेडणे, डिचोली, पेडे म्हापसा, चिखली, काणकोण, सांगे, व इतर ठिकाणी योग दिनाचा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमांना स्थानिक आमदारांची उपस्थिती असेल. योगाची प्रात्यक्षिके 40 आरोग्य केंद्र आणि 9 आयुष केंद्रावर होतील अशी माहिती आरोग्य खात्याच्या सचिवांनी दिली.
राज्यात विविध ठिकाणी योग दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सर्वांनी जवळच्या योगकेंद्रावर जाऊन योग दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित रहावे किंवा ज्यांना योगदिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित रहाणे शक्य नसल्यास त्यांनी घरात राहून योग करावा असे आवाहन क्रीडा खात्याच्या संचालकाने केले.









