मसुरे / दत्तप्रसाद पेडणेकर :
अगणित भक्ता लावूनी लळा,
आंगणेवाडी फुलणार भक्तीचा मळा,
माय भवानी तुझे लेकरू,
कुशीत तुझ्या येई..
सेवा मानून घे आई…
कोकणचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा यात्रोत्सव शनिवार 22 फेब्रुवारी रोजी होत आहे. यात्रोत्सवास येण्राया भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ आणि प्रशासन अहोरात्र मेहनत घेत आहे. गेले महिनाभर चाललेली या यात्रोत्सवासाठीची तयारी पूर्णत्वास आली असून समस्त आंगणे कुटुंबीय आई भराडी मातेच्या यात्रोत्सवास येणाऱ्या लाखो भाविकांच्या स्वागतास उत्सुक झाले आहेत.
नवसाला पावणाऱ्या व भवानीचे ऊप असलेल्या भराडी मातेच्या दर्शनासाठी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे, राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नीतेश राणे, आमदार नीलेश राणे, आमदार सुनील प्रभू, आमदार बाळा नर, खासदार अरविंद सावंत, आमदार महेश सावंत, आमदार कालिदास कोळंबकर, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, डोंबिवली येथील भाजपचे युवा नेते नंदू परब, विविध पक्षांचे राजकीय नेते, खासदार, आमदार, माजी महापौर येणार असल्याने कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सुमारे 10 लाख भाविक यात्रोत्सवास उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
- भाविक केंद्रबिंदु ठेवून नियोजन
आंगणेवाडीत येणारे लाखो भाविक देवीच्या दर्शनाची आस घेऊन येतात. वस्त्रालंकारानी सजविलेली देवी याची देही याची डोळा पाहून जीवनाचे सार्थक झाल्याचा अनुभव भाविकांना या ठिकाणी येतो. याच लाखो भाविकांना केंद्रबिंदू मानून कोणत्याही प्रकारची गैरसोय न होता भाविकांना कमीत–कमी वेळेत भराडी मातेचे दर्शन होण्यासाठी आंगणे कुटुंबिय आंगणेवाडीचे सर्व सदस्य मेहनत घेत असल्याची माहिती मुंबई मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे यानी दिली आहे.
- दोन दिवस जत्रोत्सव
श्री देवी भराडी मातेच्या आशीर्वादाने आंगणे कुटुंबियांनी यात्रेकरूंसाठी शनिवार 22 फेब्रुवारी रोजी होणऱ्या यात्रोत्सवाचा कालावधी वाढवून दुसऱ्या दिवशी म्हणजे 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत केला आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे, सचिव काका आंगणे यांनी दिली आहे. यात्रोत्सव दोन दिवसांचा असणार आहे. यानिमित देवालयात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तसेच सुवर्ण अलंकार, भरजरी साडी नेसवून मातेला सजविण्यात येणार आहे. यात्रेदिवशी मातेचे तेजोमय ऊप पाहून भाविक सुखावणार आहेत. गाभाऱ्यामध्ये ओट्या भरण्यासाठी शिस्तबध्द नियोजन आंगणे कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे. एकूण 9 रांगाद्वारे दर्शन मिळणार आहे. व्हिआयपी व अपंग भक्तांना वेगळी रांग आहे. वीज वितरण कंपनीचे सात अभियंता, 45 वायरमन अखंडित वीज पुरवठ्यासाठी कार्यरत असणार आहेत. कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी सिंधुदुर्गसह पालघर, रत्नागिरी, ठाणे, रायगड येथून अतिरिक्त पोलीस कर्मचारी मागविण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस प्रमुख सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी, सहा पोलीस उपअधीक्षक, 13 पोलीस निरीक्षक, 32 सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, 500 पोलीस अंमलदार, 2 दंगल नियंत्रण पथक, 150 होमगार्ड तसेच घातपात विरोधी पथक नेमण्यात आले आहे.
भाविकांच्या सुरक्षेसाठी यात्रा परिसरात 48 सीसीटीव्ही कॅमेरे, दहा व्हीडिओ शूटिंग कॅमेरे व ड्रोन कॅमेऱ्यांच्या मदतीने यात्रा परिसराची निगराणी ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी दिली. दरम्यान शुक्रवारी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना अप्पर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांनी आंगणेवाडी येथे दिल्या. जिल्हा आरोग्य विभागाकडून मंदिर परिसर, शाळा व मसुरे आरोग्य केंद्र येथे आरोग्य पथक असणार असून प्रत्येक पथकात वैधकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी असणार आहेत. 5 ऊग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. बिळवस ग्रामपंचायतीच्यावतीने यात्रोत्सव कालावधीमध्ये भाविकांना विविध सुख–सोयी निर्माण केल्या आहेत. याबाबत भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे. यावर्षी सुद्धा या यात्रा उत्सवामध्ये विविध पक्षांची बॅनरबाजी आणि विविध पक्षांची हायटेक कार्यालय थाटण्यात आलेली आहेत. यावेळी आंगणेवाडी मंडळाच्यावतीने सर्व पत्रकारांसाठी पत्रकार कक्ष उपलब्ध करण्यात आलेला असून या ठिकाणी वायफाय सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. लाखो भाविकांच्या स्वागतासाठी आंगणेवाडी आणि आंगणे कुटुंबिय सज्ज झाले आहेत.








