श्रेयस अय्यर, दीपक चहरच्या कामगिरीकडे राहील लक्ष, वॉशिंग्टन सुंदरलाही आजमावून पाहिले जाण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ बेंगळूर
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेचे जेतेपद निश्चित केलेले असल्याने आज रविवारी येथे होणार असलेला पाचवा सामना हा मालिकेच्या दृष्टीने जरी महत्त्वाचा नसला, तरी संघ व्यवस्थापनाकडून पुढील मालिकेच्या तयारी करण्याच्या दृष्टीने त्याकडे पाहिले जाईल. श्रेयस अय्यर आणि दीपक चहर यांची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 10 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका असेल. त्यादृष्टीने डर्बन येथे दक्षिण आफ्रिकेचा सामना करण्यापूर्वी शेवटच्या सामन्यात त्यांच्याकडून चांगली कामगिरी झालेली पाहण्यास संघ व्यवस्थापन उत्सुक असेल.
अलीकडील 50 षटकांच्या सामन्यांच्या विश्वचषकात अय्यरला फार मोठी झेप घेता आली नव्हती. गेल्या नोव्हेंबरमध्ये नेपियर येथे न्यूझीलंडविऊद्ध खेळल्यानंतर शुक्रवारी रायपूर येथे खेळलेला सामना हा या मुंबईकर खेळाडूचा मागील एका वर्षातील पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना होता. एकही चौकार न लगावता 7 चेंडूत आठ धावा काढताना त्याची धडपड स्पष्टपणे दिसून आली. त्यामुळे अय्यर आपली कामगिरी सुधारण्यासाठी प्रयत्नरत राहील आणि तो चिन्नास्वामी स्टेडियमवर फलंदाजीसाठी आसुसलेला असेल. कारण येथेच त्याने विश्वचषक स्पर्धेतील नेदरलँड्सविऊद्धच्या सामन्यात शतक नोंदविले होते.
दुसरीकडे, चहरही दुखापतीमुळे दीर्घ कालावधीनंतर परतलेला आहे आणि तो देखील अय्यरसारख्याच परिस्थितीत सापडलेला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये इंदूर येथे दक्षिण आफ्रिकेविऊद्धचा सामना खेळल्यानंतर तो आता ऑस्ट्रेलियाविऊद्धचा चौथा टी20 सामना खेळलेला आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या राजस्थान प्रीमियर लीगसारख्या देशांतर्गत स्पर्धेद्वारे पुनरागमन केलेल्या या 31 वर्षीय वेगवान गोलंदाजाने चालू मालिकेतील चौथ्या टी20 सामन्यात टीम डेव्हिड आणि मॅथ्यू शॉर्ट यांचे बळी घेत छाप पाडली. परंतु चार षटकांत त्याने 44 धावा दिल्या. चिन्नास्वामीवरील खेळपट्टीचे स्वरूप कदाचित त्याला आवडणार नाही, परंतु चहरकडे त्यावर मात करण्याच्या दृष्टीने आवश्यक विविधता आहे. ऑस्ट्रेलियाविऊद्धची प्रभावी कामगिरी चहरचा आत्मविश्वास उंचावून जाईल आणि त्याला मालिकेच्या निकालाविषयी चिंता करण्याचीही गरज नाही. कारण सूर्यकुमार यादवच्या संघाने आधीच 3-1 ने अजिंक्य आघाडी घेतली आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरकडे देखील व्यवस्थापनाचे लक्ष राहील. सुंदरला त्याच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या टप्प्यांवर दुखापतींचा सामना करावा लागला आहे. तामिळनाडूच्या या 24 वर्षीय खेळाडूने या वर्षाच्या सुऊवातीला 1 फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथे झालेल्या न्यूझीलंडविऊद्धच्या टी-20 लढतीतून भारतीय संघात पुनरागमन केले होते. पण त्याला त्या सामन्यात फलंदाजी तसेच गोलंदाजीही करता आली नाही. तेव्हापासून, सुंदर आणखी पाच टी-20 सामने खेळलेला आहे. त्यातील दोन आयर्लंडविऊद्ध मलाहाइड येथे आणि तीन सामने हांगझाऊ आशियाई क्रीडास्पर्धेत तो खेळलेला आहे. त्यातून त्याने आपली सुधारलेली तंदुरुस्ती दाखवून दिलेली आहे. हे समाधानकारक दिसले, तरी सुंदरला त्या सामन्यांतून फक्त दोन बळी घेतला आले आणि ते सर्व ‘एशियाड’च्या उपांत्य फेरीतील बांगलादेशविऊद्धच्या सामन्यात त्याला मिळाले.
त्यामुळे व्यवस्थापन सुंदरला ऑस्ट्रेलियाविऊद्ध पडताळून पाहण्यास उत्सुक असेल आणि त्याला डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलच्या जागी स्थान दिले जाऊ शकते, ज्याचा दक्षिण आफ्रिकेविऊद्धच्या भारताच्या ‘टी-20’20 संघात समावेश करण्यात आलेला नाही. भारताच्या गेल्या चार सामन्यांमधील कामगिरीची अनेक वैशिष्ट्यो असून त्यापैकी सूर्यकुमार यादव, ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंग, यशस्वी जैस्वाल आणि जितेश शर्माच्या जागी पुनरागमन करू शकणारा इशान किशन यांनी प्रभावी फलंदाजी केलेली आहे, तर लेगस्पिनर रवी बिश्नोईने सात बळी घेत गोलंदाजीत अव्वल स्थान पटकावलेले आहे. दुसऱ्या बाजूने ऑस्ट्रेलियाकडे आता गमावण्यासारखे काहीही नाही. पण मॅथ्यू वेड व त्याच्या सहकाऱ्यांना शेवटच्या सामन्यात विजय मिळवून मायदेशी परतणे आवडेल.
संघ : भारत-सूर्यकुमार यादव (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार.
ऑस्ट्रेलिया-मॅथ्यू वेड (कर्णधार), जेसन बेहरेनडॉर्फ, टीम डेव्हिड, बेन ड्वार्शुईस, नॅथन एलिस, ख्रिस ग्रीन, एरॉन हार्डी, ट्रेव्हिस हेड, बेन मॅकडरमॉट, जोश फिलिप, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट, केन रिचर्डसन.
सामन्याची वेळ-संध्याकाळी 7 वा.