उद्या उमेदवारी अर्जांची छाननी : माघार घेण्यासाठी 8 एप्रिल शेवटचा दिवस
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात 26 एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे. दक्षिण कर्नाटकातील 14 मतदारसंघांमध्ये 26 एप्रिल रोजी मतदान होणार असून बुधवारपर्यंत …………….. उमेदवारांचे ….. अर्ज दाखल झाले.
राज्यातील पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याचा 4 एप्रिल हा शेवटचा दिवस आहे. 5 रोजी अर्ज छाननी होईल. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 8 एप्रिल शेवटचा दिवस आहे. निवडणूक आखाड्यात उतरलेल्या अनेक मातब्बर नेत्यांनी यापूर्वीच उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. बुधवारी बेंगळूर उत्तर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे, काँग्रेसचे उमेदवार एम. व्ही. राजीव गौडा यांनी तर म्हैसूर मतदारसंघातून यदूवीर कृष्णदत्त चामराज वडेयर यांनी अर्ज दाखल केला. यदूवीर वडेयर यांनी सोमवारी एक अर्ज भरला होता. बुधवारी त्यांनी उमेदवारी अर्जाचा आणखी एक सेट दाखल केला आहे.
चामराजनगर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार सुनील बोस आणि म्हैसूरमधून एम. लक्ष्मण यांनी उमेदवारी दाखल केला. सुनील बोस हे मंत्री डॉ. एच. सी. महादेवप्पा यांचे पुत्र आहेत. या उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपस्थित होते.
माजी मंत्री व्ही. सोमन्ना, गोविंद कारजोळ, डॉ. के. सुधाकर, विद्यमान खासदार पी. सी. मोहन, डी. के. सुरेश, प्रज्ज्वल रेवण्णा तसेच रक्षा रामय्या, दिग्गज नेत्यांची मुले श्रेयस पटेल, सौम्या रे•ाr, वेंकटरमणेगौडा (स्टार चंद्रू) यांनी यापूर्वीच उमेदवारी अर्ज सादर केले आहेत.
मंड्या मतदारसंघातून भाजप-निजद युतीतर्फे निवडणूक लढविणारे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी हे गुरुवारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तर प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. सी. एन. मंजुनाथ हे देखील गुरुवारी भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तसेच, बेंगळूर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार तेजस्वी सूर्या आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.
राज्यात प्रथम दक्षिण कर्नाटक भागातील उडुपी-चिक्कमंगळूर, हासन, मंगळूर, चित्रदुर्ग, तुमकूर, मंड्या, म्हैसूर, चामराजनगर, बेंगळूर ग्रामीण, बेंगळूर उत्तर, बेंगळूर दक्षिण, बेंगळूर सेंट्रल, चिक्कबळ्ळापूर आणि कोलार या 14 लोकसभा मतदारसंघांत निवडणूक होणार आहे.
राज्यातील पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 28 मार्च रोजी अधिसूचना जारी करण्यात आली होते. तेव्हापासून उमेदवारी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आतापर्यंत 15 मतदारसंघातील विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह 100 हून अधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.









