गतवर्षीच्या तुलनेत सुमारे 22 इंच कमी : परतीचा पाऊस जोर धरणार
पणजी : यंदाच्या मोसमी पावसाचा आज दि. 30 सप्टेंबर हा अखेरचा दिवस असून एक जूनपासून आतापर्यंत 125 इंच पावसाची गोव्यात नोंद झाली आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत यंदाचा पाऊस चार पूर्णांक दोन टक्क्यांनी अधिक आहे, मात्र गतवर्षीच्या तुलनेत तो सुमारे 22 इंच कमी ठरतो. मोसमी पाऊस संपुष्टात येण्याचा आजचा अखेरचा दिवस असला तरी पावसाचा जोर यानंतरही बराच वाढण्याची शक्यता आहे. आज अत्यल्प प्रमाणात पाऊस पडेल असा अंदाज आहे. 1 ऑक्टोबरपर्यंत गोव्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. गेल्या 24 तासात अर्थात रविवारी रात्री गोव्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडला.
काणकोणमध्ये सर्वाधिक चार इंच पावसाची नोंद झाली. केपे येथे तीन, पेडणे येथे दोन इंच, मडगाव, म्हापसा, जुने गोवे येथे प्रत्येकी 1.45 इंच पाऊस पडला. धारबांदोडा, मुरगाव, सांगे येथे प्रत्येकी दीड इंच पाऊस पडला. साखळी व पणजी येथे प्रत्येकी एक इंच पाऊस पडला. रविवारच्या या जोरदार पावसामुळे गोव्यात गेल्या 24 तासात सरासरी पावणे दोन इंच पाऊस पडला. यामुळे यंदाच्या मौसमातील पावसाची नोंद 124. 75 इंच एवढी झालेली आहे. सोमवारी दिवसभरात गोव्यातील काही भागात अधूनमधून पावसाच्या सरी पडत होत्या. आज 30 सप्टेंबर रोजी हवामान खात्याच्या नोंदणीनुसार मोसमाचा अखेरचा दिवस ठरतो. त्यामुळे आजपर्यंत होणारी नोंद हा या मोसमातील पाऊस गणला जाईल.
प्रत्यक्षात तब्बल 158 इंच पाऊस
यंदाच्या मोसमाचे आणखी एक वैशिष्ट्या म्हणजे 15 मे पासून गोव्यातील विविध भागात पाऊस सुरू झाला होता आणि पावसाचा खरा जोर हा 18 मे पासून होता आणि 31 मे पर्यंत गोव्यात सरासरी 28 इंच पावसाची नोंद झाली. म्हणजे यंदाच्या मोसमात एकूण पाऊस पाहता 158 इंच एवढा पाऊस झालेला आहे. यावर्षीपासून धारबांदोडा हे नवीन केंद्र सुरू झाले आणि तिथे आतापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. परतीचा पाऊस गोव्यात यावर्षी बराच जोर धरणार असा अंदाज आहे आणि हा पाऊस मुसळधारपणे कोसळत असतो. ऐन दिवाळीमध्ये पावसाची शक्यता आहे. यंदाच्या मोसमात आतापर्यंत पडलेला पाऊस गृहीत धरता सर्वाधिक 163 इंच पाऊस धारबांदोडा येथे पडला तर सर्वात कमी पावसाची नोंद मुरगावात 85 इंच झालेली आहे. वाळपई, धारबांदोडा, केपे व सांगे या चार केंद्रांनी इंचांचे दीड शतक पार केले. दाबोळी व मुरगाव वगळता इतर सर्व केंद्रानी इंचांचे शतक पार केलेले आहे.









