तीन दिवसांपासून लोकांनी भेट देऊन लुटला खरेदीचा आनंद
बेळगाव : दिवाळीची खरेदी एकाच छताखाली करता यावी, या हेतूने मिलेनियम गार्डन येथे भरलेल्या बेला बाजारचा मंगळवारी शेवटचा दिवस आहे. गेल्या तीन दिवसांपासून बेला बाजारला बेळगावसह गोवा आणि आसपासच्या गावांतील लोकांनीही भेट देऊन खरेदीचा आनंद लुटला. बेळगावमधील उद्योजक महिलांना प्रामुख्याने गरजू महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना व्यासपीठ मिळावे, या हेतूने बेला बाजार भरविण्यात येतो. यंदा सलग चार दिवस हा बाजार भरविला. बेला बाजार भरण्यापूर्वी आयोजकांनी सर्वांना फॉर्म पाठविले होते. त्यातून एकूण 400 फॉर्मपैकी ज्या गरजू आहेत, ज्यांना अर्थार्जन करून स्वावलंबी होण्याची नितांत गरज आहे किंवा ज्यांच्यावर कुटुंब चालत आहे, अशा महिलांना प्राधान्य देण्यात आले. बेला बाजारमध्ये प्रामुख्याने महिलांनी घरगुती स्वरुपात तयार केलेल्या उत्पन्नांना व्यासपीठ देण्यात आले आहे. त्यामध्ये दागिने, पर्स, तोरण, तयार ड्रेस, पाऊच, याबरोबरच कृत्रिम दागिने, स्वयंपाकाची भांडी, पारंपरिक भांडी, नॉनस्टीक कुकवेअर, सिल्व्हर कोटेड, पूजा साहित्य, टेराकोटाचे साहित्य आणि सजावटीच्या वस्तू यांचा समावेश आहे. या बेला बाजारमुळे सर्वसामान्य महिलांना विक्री कौशल्याचा अनुभव आला. शिवाय त्यांच्या उत्पादनाला बाजारपेठही मिळाली, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.









