वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 ऊपयांच्या नोटा जमा करण्यासाठी आणि बदलण्यासाठी निश्चित केलेली मुदत शनिवार, 7 ऑक्टोबर रोजी संपत आहे. आतापर्यंतच्या नियमानुसार 7 ऑक्टोबरपर्यंतच 2000 रुपयांच्या नोटा कोणत्याही बँकेत जमा किंवा बदलून घेता येतील. सध्याच्या निर्धारित मुदतवाढीनुसार 8 ऑक्टोबरपासून 2000 रुपयांच्या नोटा दैनंदिन चलनातून कालबाह्या ठरणार आहेत. त्यामुळे चलनात किंवा साठा स्वरुपात ठेवण्यात आलेल्या नोटा आज शनिवारीच बँकेत जमा कराव्या लागणार आहेत. तथापि, रिझर्व्ह बँक किंवा सरकारने पुन्हा मुदत वाढवल्यास आणखी एक संधी लोकांना मिळू शकते. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 2000 रुपयांच्या नोटांपैकी जवळपास 96 टक्के मूल्याच्या नोटा लोकांनी बँकिंग प्रणाली किंवा आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. उर्वरित 4 टक्के मूल्याच्या नोटाही जमा करून घेण्यासाठी पुन्हा एकदा मुदत वाढवून मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.









