पुणे / प्रतिनिधी :
शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के जागांच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या प्रत्यक्ष प्रवेशासाठी आज सोमवार (दि. ८) हा शेवटचा दिवस असून, आतापर्यंत ४८ हजार १९ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. आरटीईच्या ४६ हजार ४८१ जागा अद्याप रिक्त असून पालकांना प्रवेशासाठी पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.
आरटीईची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू असून प्रवेशासाठी पालकांना दि. ८ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत आज संपत आहे. मात्र, निम्म्या जागांवर प्रवेश झालेले नाहीत. त्यामुळे पुन्हा प्रवेशासाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवसापासून संकेतस्थळ बंद असल्याने पालकांना प्रवेश घेण्यासाठी अडथळे येत होते. त्यामुळे प्राथमिक शिक्षण संचलनालयाकडून पालकांना प्रवेशासाठी पुरेसा अवधी दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार प्रवेशासाठी मुदत वाढविण्यात आली. प्रत्यक्षात आरटीईच्या निम्म्याच जागा भरण्यात आल्या आहेत.
आरटीईच्या ऑनलाइन सोडतीतून ९४ हजार ७०० विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली. यंदा राज्यभरात आरटीईच्या १ लाख १ हजार ८४६ हजार इतक्या जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत. यासाठी ३ लाख ६४ हजार ४१३ इतके अर्ज आले होते.








