प्रतिनिधी/ बेळगाव
कर्नाटक शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) साठी अर्ज करण्याची आज शेवटची संधी आहे. रविवार दि. 9 रोजी सायंकाळपर्यंत भावी शिक्षकांना अर्ज करता येणार आहे. 7 डिसेंबर रोजी टीईटी घेतली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी न्यायालयाने सध्या नोकरीत असलेल्या शिक्षकांनाही टीईटी उत्तीर्ण असणे सक्तीचे आहे, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे शिक्षकांकडून यावर्षी टीईटी दिली जाणार आहे. त्यामुळे यावेळी टीईटी देणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. 23 ऑक्टोबरपासून कर्नाटक टीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. 9 नोव्हेंबर अर्ज करण्याची, तसेच ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख आहे. www.schooleducation.in या संकेतस्थळावर जाऊन उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत.
पहिली ते पाचवीच्या शिक्षकांसाठी पेपर क्र. 1 घेतला जाणार आहे. तर सहावी ते आठवीसाठी पेपर क्र. 2 होणार आहे. डीएड् व बीएड् उत्तीर्ण उमेदवारांना हे दोन्ही पेपर देता येणार आहेत.









