शिक्षणतज्ञ अभय भंडारी यांची उपस्थिती
बेळगाव : साऊथ कोकण एज्युकेशन सोसायटीचा स्थापना दिन बुधवार दि. 6 रोजी होणार आहे. सकाळी 10.30 वा. आरपीडी कॉलेजच्या के. एम. गिरी सभागृहात कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाला पुणे येथील शिक्षणतज्ञ व पर्यावरणप्रेमी अभय भंडारी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर राजमाता राणी पार्वती देवी यांचे नातू खेमराज सावंत-भोसले उपस्थित राहतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन डॉ. किरण ठाकुर असणार आहेत.
अभय भंडारी यांचा अल्पपरिचय पुढीलप्रमाणे
बांधकाम व्यावसायिक म्हणून परिचित असलेले अभय भंडारी यांनी अभियांत्रिकीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. स्वदेशीचे प्रणेते राजीव दीक्षित यांच्यासमवेत आजादी बचाव आंदोलनात त्यांचा सहभाग होता. भारतीय संस्कृती, हिंदू धर्म, इतिहास, तत्वज्ञान, राष्ट्र पुरुषांची चरित्रे व जीवनकार्य, कृषी, शिक्षण, आरोग्य, अर्थकारण, राजकारण, प्रशासन, बदलता भारत, स्वदेशी स्वातंत्र, स्वराज्य आदी विषयांवर विवेचन केले आहे. सांगलीच्या विटा गावाजवळ 3.5 एकर माळरानावर पाणी व वीज उपलब्ध नाही, अशा ठिकाणी दोन हजार वृक्षांची लागवड करून प्रकल्प साकारला. पारंपरिक भारतीय वृक्ष बहरले असून यासाठी 18 वर्षात 16.80 लाख ली. पाणी टँकरने विकत घेऊन वापरले. सामाजिक प्रबोधनासाठी महाराष्ट्रभर दोन हजाराहून अधिक व्याख्याने दिली आहेत.









