सायकल फेरीतून होणार निषेध : महाराष्ट्रातील नेतेमंडळींना निमंत्रण
बेळगाव : सीमावासियांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी बुधवार दि. 1 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली मूक सायकल फेरी काढून निषेध व्यक्त केला जाणार आहे. बेळगाव, खानापूर, निपाणीसह संपूर्ण सीमाभागात हरताळ पाळला जाणार असून सायकल फेरीमध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून आपली वज्रमूठ दाखवून द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने करण्यात आले आहे. यामुळे पुन्हा एकदा मराठी भाषिकांचा एल्गार बुधवारी पहायला मिळणार आहे.
बुधवार दि. 1 रोजी सकाळी 9 वाजता धर्मवीर संभाजी उद्यानापासून सायकल फेरीला सुरुवात होईल. आपला निषेध व्यक्त करण्यासाठी काळ्या रंगाचे कपडे, काळे ध्वज, काळ्या टोप्या घालून केंद्र सरकार विरुद्धचा निषेध केला जाणार आहे. परंपरेनुसार बेळगाव शहर, शहापूर, गोवावेसमार्गे सायकल फेरी जाणार आहे. मराठा मंदिर येथे सभा घेतली जाणार आहे. या सभेसाठी महाराष्ट्रातील नेतेमंडळींना मध्यवर्ती म. ए. समितीने निमंत्रण दिले असून यापैकी कोणते नेते उपस्थित राहणार हा औत्सुक्याचा विषय ठरला आहे.
केंद्र सरकारने भाषावार प्रांतरचना केली आणि पूर्वीच्या मुंबई प्रांतातील बेळगावसह संपूर्ण सीमाभाग तत्कालिन म्हैसूर प्रांतात डांबण्यात आला. याचा निषेध 1956 पासून आजतागायत शांततेच्या मार्गाने केला जात आहे. हा लढा कोणतीही भाषा अथवा राज्य सरकारविरुद्धचा नसून केंद्र सरकारने केलेल्या अन्यायाविरुद्धचा आहे. प्रतिवर्षी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली सीमाभागात हरताळ पाळून निषेध व्यक्त केला जातो. सायकल फेरीसाठी परवानगी मिळो अथवा ना मिळो परंतु काळा दिन यशस्वी करणारच असा निर्धार म. ए. समितीने केला आहे. मागील 67 वर्षांपासून सुरू असणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी प्रत्येक सीमावासियाने या लढ्यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन शहर म. ए. समिती, तालुका म. ए. समिती, महिला आघाडी, युवा समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
सीमाभागात आज कडकडीत हरताळ
आपल्यावर झालेल्या अन्यायाचा निषेध नोंदवण्यासाठी सीमाभागात कडकडीत हरताळ पाळला जातो. मराठी भाषिक आपले व्यवसाय, उद्योग 1 नोव्हेंबर रोजी बंद ठेवून आपला निषेध व्यक्त करीत असतात. केवळ शहरातच नाही तर बेळगाव तालुक्यासह खानापूर, निपाणी येथेही निषेध नोंदवला जातो. यावर्षी महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, कोल्हापूर, सातारा, सांगली याठिकाणीही निषेध व्यक्त केला जाणार आहे.









