कोल्हापूर :
कोल्हापूर महानगरपालिकेचा 52 वा वर्धापन दिन आज (रविवारी) साजरा होत आहे. या निमीत्त सकाळी 9.00 वाजता महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकामध्ये प्रशासक कार्तिकेयन एस यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात येणार आहे. ध्वजारोहनानंतर सकाळी 09.10 वाजता माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत शपथ घेण्यात येणार आहे. यानंतर देशाच्या रक्षणाकरीता धारातीर्थ पडलेल्या जवानांच्या वीरमाता, वीरपिता व वीरपत्नी यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या वर्धापन दिनानिमीत्त महापालिकेच्या वतीने सासने ग्राउंड येथे खाद्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यास शुक्रवार पासून सुरुवात झाली. या महोत्सवामध्ये महिला बचतगटांनी बनवलेल्या खाद्य पदार्थांचा 100 प्रकारचे स्टॉल लावले आहेत. यामध्ये मांसाहारी लोकांसाठी वडा कोंबडा, बिर्याणी रस्सा, तांबडा पांढरा रस्सा, चिकन 65, नॉन व्हेज रोल, खांडोळी, रक्ती मुंडी, सोलापूरी चिकन, मटण लोणचे तसेच शुध्द शाकाहारीमध्ये थाली पीठ, झुणका भाकरी, पुरण पोळी, विविध प्रकारची बिस्कीटे, आंबोळी, दावनगिरी डोसा, वडापाव, पकोडे, व्हेज रोल, पाणी पुरी, पिझ्झा, भेल, स्प्रिंग पोटॅटो, पापड, तिकट सांडगे, दाबेली यासह विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल लावण्यात आले आहेत. यास नागरीकांचा प्रतिसाद मिळत आहे.








