विविध मान्यवरांची उपस्थिती : अभिनेत्री रोहिणी हट्टंगडींची प्रमुख उपस्थिती
प्रतिनिधी/ येळ्ळूर
येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्यावतीने रविवार दि. 19 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज संमेलननगरी (मराठी मुलांची शाळा, येळ्ळूरवाडी, परमेश्वरनगर) येथील मैदानात 18 वे येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होणार आहे. हे संमेलन साहित्यिक प्रा. डॉ. मिलिंद कसबे (पुणे) यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तर उद्घाटक म्हणून अॅड. सुधीर चव्हाण राहणार आहेत. स्वागताध्यक्ष माजी तालुका पंचायत सदस्य रावजी पाटील असणार आहेत. पाच सत्रांमध्ये हे संमेलन होणार असून साहित्य व सामाजिक पुरस्कारांचे वितरण, विजेत्या स्पर्धकांना परितोषिकांचे वितरणही करण्यात येणार आहे. सकाळी 8.30 वाजता महाराष्ट्र हायस्कूल येळ्ळूर येथून ग्रंथदिंडीला प्रारंभ होणार आहे.
पहिल्या सत्रात संमेलनाध्यक्ष डॉ. मिलिंद कसबे यांचे अध्यक्षीय भाषण होणार आहे. दुसऱ्या सत्रात मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांची प्रकट मुलाखत होणार आहे. तिसऱ्या सत्रामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, प्रा. सुमित्रा यल्लोजीराव मेणसे स्मृतिप्रीत्यर्थ घेण्यात आलेल्या कथाकथन स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार वितरित करण्यात येणार आहेत.
चौथ्या सत्रामध्ये पुणे येथील इतिहासाचे अभ्यासक औदुंबर लोंढे यांचे ‘ढाल तलवारी पलिकडेचे छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. पाचव्या सत्रात मुंबई येथील कवी प्रा. प्रशांत मोरे ‘आई तुझा हात परिस’ हा कवितेचा कार्यक्रम सादर करणार आहेत.
मान्यवरांचा परिचय पुढीलप्रमाणे…

प्रा. डॉ. मिलिंद कसबे (संमेलनाध्यक्ष)
मिलिंद कसबे हे पुणे जिल्ह्यातील नारायणगाव महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक आहेत. मराठी साहित्यात समिक्षक व लेखक म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. त्यांची अनेक वैचारिक व वाङमयीन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर लोककलेच्या क्षेत्रात संशोधनाचे कार्य केले आहे. तमाशा कला आणि कलावंत, आंबेडकर वादापुढील नवी आव्हाने, साहित्य आणि लोककला, मार्क्स-आंबेडकरी दिशा ही त्यांची प्रकाशित झालेली पुस्तके आहेत. गुजरात फाईल्स, राणा अय्युब यांच्या इंग्रजी पुस्तकाच्या मराठी भाषेतील आवृत्तीचे संपादन त्यांनी केले आहे. याचबरोबर सामाजिक क्षेत्रातही डॉ. कसबे यांचे कार्य उल्लेखनिय आहे.

अॅड. सुधीर चव्हाण (उद्घाटक)
यंदाच्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन अॅड. सुधीर चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. ते बेळगाव न्यायालयामध्ये वकील म्हणून काम करत आहेत. याचबरोबर बेळगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. सामाजिक, शैक्षणिक कार्यात नेहमीच ते अग्रेसर आहेत. अनेक पतसंस्थांचे कायदेशीर सल्लागार म्हणून काम करत आहेत. क्षत्रीय मराठा परिषदचे जिल्हा सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत.
रावजी पाटील (स्वागताध्यक्ष) 18 डीआय 7
साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून माजी तालुका पंचायत सदस्य रावजी पाटील असणार आहेत. त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक कार्यात नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. याचबरोबर म. ए. समितीच्या प्रत्येक लढ्यामध्ये त्यांनी भाग घेतला आहे.

अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी
चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी, मालिका अशा विविध क्षेत्रांमध्ये अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी अभिनयाचा वेगळा ठसा उमटविला आहे. गांधी (1982) या चित्रपटातील कस्तुरबांच्या भूमिकेमुळे त्यांना चित्रपट जगतात ख्याती मिळाली. त्यांची अभिनय कारकिर्दीची सुरुवात मराठी रंगभूमीवर झाली. विविध भाषांमधील नाट्याप्रयोगांमध्ये वेगवेगळ्या भूमिका त्यांनी केल्या आहेत. जगदंबा एकपात्री प्रयोगात रोहिणी हट्टंगडी यांनी केलेली भूमिका लक्षणीय ठरली आहे. मराठीसह त्यांनी गुजराती व्यावसायिक नाटकांमध्येही त्यांनी काम केले आहे. अजिब दास्तान, चक्र, अर्थ, सारांश, अग्निपथ या हिंदी चित्रपटांसह दक्षिणात्य चित्रपटही त्यांनी केले आहेत. चार दिवस सासुचे, होणार सून मी या घरची या गाजलेल्या मालिकांमध्येही त्यांनी काम केले आहे.

प्रा. औदुंबर लोंढे (इतिहासाचे अभ्यासक)
प्रा. औदुंबर लोंढे हे एक प्रसिद्ध वक्ते व इतिहास अभ्यासक आहेत. त्यांनी एमईपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर डिप्लोमा इन जर्नालिझम, एलएलबी शिक्षण सध्या घेत आहेत. महाराष्ट्रात विविध ठिकाणी वक्ते म्हणून त्यांनी अनेक भाषणे केली आहेत. बुद्ध, जिजाऊ, छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर, आण्णाभाऊ साठे यांसह इतर महापुरुषांवर त्यांनी व्याख्याने दिली आहेत.

कवी प्रा. प्रशांत मोरे
कवी प्रा. प्रशांत मोरे हे कल्याण-मुंबई येथील के. एम. अग्रवाल महाविद्यालयात मराठीचे अध्यापन करीत आहेत. त्यांचे आजपर्यंत प्रसिद्ध झालेले अनेक काव्य संग्रह आहेत. वेदना सातारकर?, हजर सर..!, कबिरांचे देणे, ही वस्ती सस्ती हाय पोरा…!, अभिवादन बा भीमा…!, जळत्या दशकाची लोकगाथा, आईचा कविता खंड, 1, 2 यासह इतर लेखन त्यांनी केले आहे. स्पर्श चित्रपटाचे गीत लेखन व पार्श्वगायनही त्यांनी केले आहे.









