वृत्तसंस्था/ .नवी दिल्ली
विश्वचषकात आज शनिवारी होणार असलेल्या दोन सामन्यांत दक्षिण आफ्रिकेची गांठ श्रीलंकेशी, तर बांगलादेशची गांठ अफगाणिस्तानशी पडेल. दुखापतींशी झुंज देत असलेल्या दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या दोन्ही संघांना त्यांचे अनुभवी खेळाडू विजयी सुरूवात करून देतील, अशा आशा असेल. दक्षिण आफ्रिकेकडे वेगवान गोलंदाज अॅनरिक नॉर्त्झे आणि सिसांडा मगाला नाही, तर श्रीलंकेला लेगस्पिनर वानिंदू हसरंगा आणि आघाडीचे वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीरा आणि लाहिरू मदुशंका यांच्यासह काही प्रमुख खेळाडूंची उणीव भासेल.

नॉर्त्झेच्या अनुपस्थितीत दक्षिण आफ्रिका कागिसो रबाडाच्या अनुभवावर आणि 23 वर्षीय गेराल्ड कोएत्झीवर अवलंबून असेल. फलंदाजीत त्यांचे डेव्हिड मिलर आणि कर्णधार टेम्बा बावुमा चांगलेच फॉर्मात आहेत. बावुमाची यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकसोबतची भागीदारी श्रीलंकेसाठी धोकादायक ठरू शकते. त्याशिवाय हेन्रिक क्लासेनकडे पहिल्याच चेंडूपासून फटकेबाजीची क्षमता आहे.
श्रीलंकेच्या बाबतीत प्रमुख गोलंदाजांच्या अनुपस्थितीत महेश थीक्षाना आणि ड्युनिथ वेललागे या फिरकी जोडीवर बळी घेण्याची जबाबदारी असेल, तर लाहिरू कुमारा, दिलशान मदुशंका, मथीशा पाथिराना आणि कसून रजिथ वेगवान मारा सांभाळतील. त्यांच्याकडे दिमुथ कऊणारत्ने, कुसल परेरा, पथुम निसांका आणि सदीरा समरविक्रमा यासारखे चांगले फलंदाज आहेत. अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज कुसल मेंडिस त्यात फटकेबाजीची भर घालू शकतो.

दुसरीकडे, बांगलादेशला कर्णधार शाकिब उल हसन आणि तमिम इक्बाल यांच्यातील संघर्षातून बाहेर सरून अफगाणिस्तानविरुद्ध चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. त्यांच्याकडे शाकिब, मुस्तफिजूर रेहमान, यष्टिरक्षक फलंदाज मुशफिकर रहिम व लिटन दास, अष्टपैलू मोहम्मदुल्लाह, नजमुल शांतो, शोरिफूल इस्लाम यासारखे अनुभवी व युवा खेळाडू आहेत. फिरकी मारा ही त्यांची प्रमुख ताकद आहे. अफगाणिस्तानचा देखील मोहम्मद नबी, रशिद खान, मुजिब उर रेहमान, नूर अहमद यांचा समावेश असलेल्या फिरकीवरच मुख्य भार राहील.









