निपाणी परिसरात तंबाखू पिक वाचविण्यासाठी शेतकऱयांची कसरत
वार्ताहर /निपाणी
निपाणीसह परिसरातील ग्रामीण भागात पावसाने अद्यापही उसंत घेतल्याचे दिसत नाही. मंगळवारी सकाळी तर पावसाने परिसराला अक्षरशः झोडपून काढले. हा पाऊस सर्वच पिकांसाठी धोकादायक ठरत आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला असून यंदाचा हंगाम साधण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. हवामान खात्याने दिलेल्या निर्देशानुसार आणखी तीन ते चार दिवस पाऊस पडणार आहे. यामुळे पिकांना वाचवायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तंबाखू पीक अडचणीत आले आहे. तसेच कारखान्यांच्या गळीत हंगामासमोरही संकट निर्माण झाले आहे.
यंदा परिसरात सतत पडणारा पाऊस सर्वच शेती पिकांसाठी धोकादायक ठरत आहे. याची चिंता शेतकऱयांना लागली आहे. सोयाबीन काढणीच्या कामाला गती आल्यापासून पावसाने उसंतच घेतलेली नाही. सध्या सोयाबीन काढण्याची कामे अंतिम टप्प्यात असताना पावसाने ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली आहे. यामुळे सोयाबीन काढणी व मळणीची कामे ठप्प झाली आहेत.
निपाणी परिसरात तंबाखूचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. यंदा पावसामुळे काही शेतकऱयांना सोयाबीनची पेरणी करता आली नाही. अशा शेतकऱयांनी ऑगस्ट महिन्यातच तंबाखूच्या लावणी केल्या आहेत. तसेच अतिवृष्टीमुळे अनेकांना तंबाखू लावणी करणे अशक्य होताना लावणी लांबणीवर पडल्या होत्या. सोयाबीन काढणीनंतरदेखील काही शेतकऱयांनी तंबाखू लावणी केली आहे. सध्या तंबाखूचे पीक वाढताना आंतरमशागतीची कामे सुरू आहेत. पण संततधर पडणारा पाऊस या पिकाला मारक ठरत आहे. अति पावसामुळे तंबाखू पिकावर कडक्मया रोगाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. तसेच तंबाखूला पाणी लागण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी रासायनिक खतांची मात्रा देत पीक वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
तसेच निपाणी तालुक्यात सर्वाधिक उत्पादन क्षेत्र असणारे ऊसपीक सध्या तोडणीसाठी सज्ज आहे. परिसरातील साखर कारखान्यांनी गळीत हंगामाचा शुभारंभ केला आहे. पण पावसाने उसंत न घेतल्याने ऊसतोडणी ठप्प झाली आहे. एकीकडे अतिपावसामुळे उसाची वाढच खुंटली आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट येणार आहे. अशा परिस्थितीत आता तोडणीची कामे लांबणीर जाणार असल्याने शेतकऱयांच्या अडचणीत वाढच झाली आहे.









