सर्व्हरडाऊनमुळे तासन्तास रांगेत : शुक्रवार-शनिवारी मोजक्याच रेशनकार्डधारकांची नावनोंदणी
प्रतिनिधी/ बेळगाव
गृहलक्ष्मी योजनेच्या नोंदणीसाठी नागरिकांची तोबा गर्दी होऊ लागली आहे. शहरातील बेळगाव वन कार्यालयांमध्ये नोंदणीसाठी महिलांच्या रांगा लागल्या होत्या. एकाचवेळी राज्यभर नोंदणी होत असल्याने सर्व्हरडाऊनची समस्या सतावत होती. त्यामुळे बराचवेळ रांगांमध्ये उभे राहण्याची वेळ महिलांवर आली.
गृहज्योती योजनेच्या नोंदणीनंतर आता गृहलक्ष्मी योजनेसाठी नावनोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बुधवार दि. 19 जुलैपासून राज्यभर या योजनेला प्रारंभ झाला. घरातील कुटुंबप्रमुख महिलेच्या खात्यामध्ये मासिक 2 हजार रुपये जमा केले जाणार आहेत. यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. राज्य सरकारने मोबाईल क्रमांक जाहीर केला असून त्यावर रेशनकार्ड क्रमांक मेसेज करावा लागतो. काही कालावधीनंतर प्रतिसादात्मक उत्तरादाखल मेसेज येतो. त्यामध्ये आपण 48 तासांनंतर आपली कागदपत्रे पडताळणी आणि नोंदणीसाठी जाण्याची सूचना केलेली असते.
48 तासांनंतर बेळगाव वन, कर्नाटक वन, ग्राम वन, बापूजी सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन नावनोंदणीचा अर्ज करता येतो. त्यासाठी आधारकार्ड क्रमांक, रेशनकार्ड क्रमांक तसेच बँक खाते क्रमांक देणे आवश्यक आहे. सोबतच रेशनकार्ड आणि बँक खात्याला जोडलेला मोबाईल घेऊन जाणे जरुरी आहे. त्या क्रमांकावर ओटीपी नंबर येतो. तो अर्ज भरणाऱ्या ऑपरेटरला सांगून अर्ज भरणा करता येतो. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपला नोंदणी क्रमांक येतो.
सर्व्हरडाऊनचा फटका
राज्यभरात एकाचवेळी नावनोंदणी प्रक्रिया सुरू असल्याने सर्व्हरडाऊनचा फटका बसत आहे. शुक्रवारी व शनिवारीही सर्व्हरडाऊन असल्यामुळे काही मोजक्याच रेशनकार्डधारकांची नावनोंदणी होऊ शकली. उर्वरित नागरिकांना तासन्तास रांगेमध्ये थांबून माघारी परतावे लागले.









