ऑनलाईन टीम / तरुण भारत :
2008 साली शिवसैनिकांनी महागाईविरोधात केलेल्या आंदोलनप्रकरणी 19 आंदोलनकर्त्यांना न्यायालयाने मागील आठवडय़ात 5 वर्षांची शिक्षा आणि प्रत्येकी 1.60 लाखांचा दंड ठोठावला. इतकी मोठी रक्कम कशी भरायची हा सर्वसामान्य शिवसैनिकांपुढे प्रश्न होता. मात्र, ही बातमी मातोश्रीपर्यंत पोहताच उद्धव ठाकरे या शिवसैनिकांच्या मदतीला धावून आले. त्यांनी पक्षाकडून 19 पैकी 15 आंदोलनकर्त्यांचा दंड न्यायालयात भरला. यावेळी आपण कट्टर शिवसैनिकाच्या मागे खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले.
काय आहे प्रकरण?
2008 साली काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना शिवसेनेने महागाई विरोधात हिंगोली गेट येथे आंदोलन केले होते. या आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि त्यामध्ये आठ बस आणि पोलिसांच्या काही वाहनांचे नुकसान झाले होते. यावेळी दोन उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी देखील जखमी झाले होते. याप्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या तत्कालीन आमदारासह 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने 11 एप्रिलला या प्रकरणी निकाल देताना शिवसेनेच्या 19 जणांना पाच वर्षांची शिक्षा आणि प्रत्येकी 1 लाख 60 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. त्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी या शिवसैनिकांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहणार असल्याचा शब्द दिला होता. दरम्यान, त्यांनी दिलेला शब्द पाळला. पक्षाकडून उद्धव ठाकरे यांनी 19 पैकी 15 शिवसैनिकांचा दंड न्यायालयात भरला.
अधिक वाचा : राज्यातून NA टॅक्स पूर्णपणे हटवणार, विखे-पाटलांची घोषणा








