मुंबईतील वीज मागणी सतत वाढणारी आहे. वीज निर्माण करणे, वीज वितरण करणे आणि वीज वहन करणे असे वीज पुरवठय़ातील तीन भाग केल्यास मुंबईतील वीज पुरवठय़ासाठी वीज वहन यंत्रणा सक्षम करण्याचे काम प्राधान्याने घ्यावे. अन्यथा गेल्या दोन वर्षात तीन वेळा मुंबईत वीज पुरवठय़ातील आणीबाणी निर्माण झाल्याच्या प्रसंगाची वारंवारता वाढू शकते…..
मुंबई आणि परिसराला वीज वहन करणारे दोन ट्रान्समिशन लिंक पडघा येथे आहेत. गेल्या गुरुवारी म्हणजे 28 एप्रिल रोजी या दोन ट्रान्समिशन लिंकपैकी एका लिंकमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे ती बंद करण्यात आली. यातून चालू असलेल्या दुसऱया लिंकवर भार येऊन काही काळात तीही बंद पडली. दोन्ही लिंक बंद पडल्याने मुंबईतील सुमारे हजार मेगावॅट वीज पुरवठा बंद पडला. याचा परिणाम मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली, बदलापूर तसेच पश्चिमेला पालघर अशा भागात त्या दिवशी वीज नव्हती. त्या लिंकमधील बिघाड दुरुस्ती केल्यावर सुमारे 38 मिनिटांनी मुंबईचा वीजपुरवठा सुरु झाला.
यावेळी मुंबई आर्थिक राजधानी असल्याने इतर परिसरांच्या तुलनेत मुंबईला प्रथम प्राधान्य देत दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर सुमारे 50 ते 60 मिनिटांनी ठाण्यातील वीज पुरवठा सुरु झाला. पुढे टप्प्याटप्प्याने वीज गेलेल्या परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आली. वीज पुरवठा बंद झाल्याच्या काळात सदर ठिकाणी वीज नसल्याने पाण्यासह अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागले.
वीजच सुरळीत नसेल तर मुंबई महानगर प्रदेशात जीवनमान ठप्प पडू शकते. मुंबई ठप्प होण्यातील त्या दिवशीचा हा तिसरा प्रसंग होय. यापूर्वी 12 ऑक्टोबर 2020 म्हणजे
लॉकडाऊनच्या काळात 400 के. व्ही. पडघा कळवा वाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्याने बंद झाली होती. त्यामुळे मुंबईतील वीज पुरवठा बाधित झाला. तर 20 फेब्रुवारी 2022 रोजी मुंबईला वीजपुरवठा करणाऱया मुलुंड-ट्रॉम्बे या 220 किलो वॅट वीज वाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्याने सकाळी साडेआठ वाजल्यापासून सकाळी पावणे दहा वाजेपर्यंत मुंबई शहर आणि उपनगरातील बेस्ट, टाटा आणि अदानी वीज कंपन्यांचा वीज पुरवठा खंडीत झाला होता. म्हणजेच गेल्या दोन वर्षात तीन वेळा मुंबईत वीज आणीबाणी निर्माण झाली होती. त्यामुळे मुंबई आणि परिसरात वीज वहन यंत्रणा सक्षम असावी असे वीज अभ्यासक अशोक पेंडसे सतत मागणी करत आहेत.
सध्या राज्यातील वीज टंचाईवर चर्चा झडत आहे. मात्र मुंबईतील वीज अडचण राज्यातील वीज अडचणीहून अगदी वेगळी आहे. मुंबईला वीज पुरवठा तीन कंपन्यांकडून होत आहे. टाटा, अदानी आणि बेस्टकडून वीज पुरवठा होत आहे. तर मुंबईतील काही मर्यादित भागात एमएसईबीकडूनही वीज पुरवठा होतो. मात्र ही मर्यादित ठिकाणं आहेत. हा भाग वगळल्यास मुंबईत टाटा, अदानी आणि बेस्टची वीज आहे. या तीन वीज कंपन्यांपैकी बेस्टकडे कोणताही सोर्स नसून अदानीकडे डहाणू येथील 500 मेगावॅटचे तर टाटाकडे चेंबूर आणि लोणावळ्या जवळील प्रत्येकी 600 मेगावॅटची अशी बाराशे मेगावॅटची क्षमता आहे.
टाटाची 1200 तर अदानीची 500 मेगावॅट असा स्वतःचा एकूण सतराशे मेगावॅट वीज पुरवठा मुंबईला करण्यात येतो. मात्र 29 एप्रिलच्या शुक्रवारी मुंबईतील विजेची मागणी वाढत जाऊन 3820 मेगावॅट एवढी झाली होती. टाटा, अदानीकडून मिळणारी 1700 मेगावॅट वीज आणि शुक्रवारची 3800 मेगावॅट वीज मागणी यांची वजाबाकी केल्यास सुमारे 2100 मेगावॅट म्हणजे 60 ते 65 टक्के वीज शुक्रवारी मुंबई बाहेरुन मुंबईत आणावी लागली. मुंबईतील वीज मागणीतील हा आतापर्यंतचा नवा उच्चांक होता. मुंबईतील वीज मागणी वाढल्याच्या प्रसंगी मुंबईत वीज वहन यंत्रणा उच्च क्षमतेची असावी हेच यातून स्पष्ट होत आहे. दरम्यान सध्या मुंबईच्या सीमेवर पाच वहन केंद्र आहेत. या पाच वहन केंद्रांवरुन मुंबईत वीज वहनाचे काम एमएसईपीसीएलची यंत्रणा करते. या एमएसईपीसीएलच्या वहन यंत्रणेतून सद्यस्थितीत 2100 मेगावॅट वीज मुंबईत आणणे देखील एक प†िरक्षा आहे. जर मुंबईतील वीज मागणी 4200 मेगावॅटवर गेली तर सुमारे 2400 मेगावॅट या वाहिन्यांवरुन मुंबईत वीज आणावी लागेल. हीच धोक्याची घंटा आहे. सुरु असलेल्या वीज वहन यंत्रणेतून वीज आणल्यास ताण निर्माण होऊन संपूर्ण वीज सेवा कोसळू शकते. मुंबईची वीज मागणी 3850 असली तरी अजून 300 मेगावॅट अधिक होऊन मुंबईला लोड शेडींग करण्याची स्थिती उद्भवण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
त्यामुळेच मुंबईत वीज वहन यंत्रणा सक्षम करण्याची मागणी समोर येत आहे. विक्रोळी आणि खारघर अशा पूर्वेकडील भागात ट्रान्समिशन वीज पुरवठा करतो. येथून हजार मेगावॅट वीज पुरवठा योजना 2022 ते 2023 मध्ये कार्यन्वित होण्याची शक्यता आहे. तर बोरिवली ते कुडुस अशा पश्चिमेकडील भागातील यंत्रणा 2023 ते 2024 या वर्षात कार्यन्वित होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. म्हणजेच येत्या एक ते दोन वर्षात पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील
कॉरीडोर विजेच्या पुरवठय़ात बळकट होण्याची मोठी शक्यता आहे. मुंबईसह राज्याची वीज वहन यंत्रणा सुधारणे आवश्यक असून ही यंत्रणा बळकट करण्यासाठी वेळ लागणार असल्याचे यावरुन स्पष्ट होते.
मुंबईला वीज टंचाईला सामोर जावे लागणार अशी शक्यता धुसर असली तरी मुंबईत वीज वाहून आणण्याच्या क्षमतेवर मर्यादा आली आहे. ही मर्यादा दिवसेंदिवस कमी होत जात आहे. मुंबईतील विजेची कमाल मागणी दिवसभरात सारखी नसते. काही ठराविक वेळांतच मुंबईत विजेची सर्वाधिक मागणी असते. यालाच पीक अवर्स म्हणतात. मुंबईचा पीक अवर्स हा दुपारी 3 ते 5 या वेळेत असतो. या दोन तासासाठी मुंबईतील विजेची कमाल मागणी वाढते. मुंबईत शेती, किंवा मोठाले कारखाने नसून प्रामुख्याने कमर्शिअल हब, शॉपिंग मॉल तसेच कॉर्पेरेट कार्यालये आहेत. यातून सर्वाधिक वीज मागणी सतत असते. मुंबईतील वीज मागणी एसीच्या माध्यमातून सर्वाधिक असते. मुंबईतील उष्मांक वाढला की एसीची मागणी वाढते.
भर पावसाळ्यात मुंबईतील विजेची गरज 1600 मेगावॅटपर्यंत सुद्धा खाली येत असते. त्यामुळे त्या काळात विजेची कोणती अडचण होत नाही. शुक्रवारी मुंबईची विजेची गरज 3850 वर गेली होती. मात्र असे प्रसंग क्वचित निर्माण होतात. तरी देखील 3800 मेगावॅट ही उन्हाळ्यातील मुंबईतील विजेची कमाल मागणी अशी नोंद झाली आहे. या नोंदीला समोर धरुनच आगामी नियोजन गरजेचे आहे. मुंबईचे तापमान 2 डिग्री सेल्सिअसने वाढले तर मुंबईची वीज मागणी 150 मेगावॅटने वाढते. त्यामुळे मुंबईतील वीज गरज ही कमाल तापमानावर अवलंबून आहे. आता पर्यंत 3300 मेगावॅटवर मुंबईतील वीज मागणी कधी गेली नसल्याचे वीज अभ्यासक अशोक पेंडसे सांगतात. मात्र अद्याप उन्हाळ्याचा मे महिना अजून सरणे बाकी असून जून महिन्याच्या अखेरीस मुंबईतील आगामी वर्षातील वीज गरजेचे गणित बांधले जाते. वीज गरज ही किती तप्त उन्हाळा असतो यावर दरवर्षीची वीज गरज अंदाज करु शकत नाही. सध्या वीज मागणीच्या रेड झोनमध्ये आपण असून सरकार त्या दिशेने ट्रान्समिशन बांधणीच्या कामाला लागले आहे. तरीही वीज पुरवठय़ात मुंबई इशारा देण्याच्या स्थितीत असल्याचे विसरुन चालणारे नाही.
राम खांदारे








