भूमीवर माणसांची प्रचंड दाटी झाली आहे. लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याचा तो परिणाम आहे. आत्ताच जगाच्या लोकसंख्येने 800 कोटींची मर्यादा ओलांडली आहे. राहण्यासाठी भूमी कमी पडू लागली आहे. असेच होत राहिले, तर पुढे काय परिस्थिती येईल, असा प्रश्न साऱ्यांच्या मनात उमटू लागला आहे. यावर ‘डीप’ नामक एका कंपनीने एक अद्भूत तोडगा शोधून काढला आहे. ही कंपनी आता लोकांना चक्क समुद्रात रहावयाला नेणार आहे. यासाठी कंपनीने पोलादाचे एक घर प्रायोगिक तत्वावर निर्माण केले आहे. हे घर समुद्रसपाटीपासून 50 मीटर खोलीवर समुद्रात प्रस्थापित केले जाईल. या घरात एक पूर्ण कुटुंब राहू शकेल.
या घराचे नामकरण या कंपनीने ‘व्हॅनगार्ड’ असे केले आहे. प्रारंभीच्या काळात या घरात केवळ संशोधक आणि वैज्ञानिक वास्तव्य करणार आहेत. ते काही काळ या घरात राहून पुन्हा भूमीवर येतील. असे ते वारंवार करतील. या घरात ते कामही करतील. त्यांचे अनुभव ते नोंद करतील. नंतर या अनुभवांच्या आधारावर या घरामध्ये आवश्यक ते परिवर्तन केले जाईल. सर्वसामान्य माणसाला त्याच्या कुटुंबासह राहण्यासाठी योग्य प्रकारचे ‘समुद्री घर’ अशा प्रकारे निर्माण करण्यात येईल. त्यानंतर मोठ्या संख्येने माणसांना समुद्राच्या पोटात राहण्यासाठी नेले जाईल. या घरात एक शयनकक्ष (बेडरुम), एक लहान हॉल, शौचायल आणि एक ‘डाईव्ह केंद्र’ अशी सोय करण्यात आलेली आहे. प्रथमत: या घराचा उपयोग खोल समुद्रात सूर मारण्यासाठी केला जाईल, ज्याला ‘स्कूबा डायव्हिंग’ असे म्हणतात. अनेक प्रयोग केल्यानंतरच या घरात माणसाचे वास्तव्य प्रदीर्घ काळासाठी केले जाणार आहे.
मानवाला केवळ भूमीवर नव्हे, तर समुद्रातही वास्तव्य करु शकणारा जीव, असा परिचय मिळवून देण्याची या कंपनीची महत्वाकांक्षा आहे. कंपनीचा हा प्रकल्प यशस्वी झाल्यास मानवाला वास्तव्यासाठी भूमी आणि समुद्र असे दोन पर्याय उपलब्ध होणार आहेत. हे त्वरित होईल, अशी शक्यता नसली, तरी नजीकच्या भविष्यकाळात ही क्रांती निश्चितच होणार आहे, असा विश्वास कंपनीला आहे. भूमीपेक्षा अधिक शांतता आणि स्वच्छता समुद्रात मिळेल. कारण येथे वाहनांचे आवाज आणि प्रदूषण असणार नाही. अशा प्रकारे हे घर कांतीकारक ठरणार आहे.









