श्रीकृष्णजन्माष्टमी उत्सव झाल्यानंतर घराघरामध्ये श्रीगणपतीच्या आगमनाची तयारी जोरात सुरू होते. सर्व आबालवृद्धाना आनंद देणारा हा सण, कारण विघ्नहर्ता असल्याने श्रीगणेश सर्वांची विघ्ने हरण करून सर्वाना संतुष्ट ठेवतात अशी भक्तांची धारणा असते. यात गैर काहीही नाही, पण श्रीगणपती कोणती विघ्ने कशी दूर करतो हे समजून घेतल्यास हा सण सार्थकी लागेल. दुर्दैवाने श्रीगणपतीकडे काय मागावे हे आरतीमध्ये दररोज भक्तिभावाने गात असूनदेखील लोकांचे त्याकडे दुर्लक्ष होते. वेदिक शास्त्रानुसार प्रत्येक देवतांची दोन रूपे असतात, एक भौतिक आणि दुसरे आध्यात्मिक. ज्या रूपाकडे आपण आकर्षित होऊ त्याप्रमाणे श्रीगणपती आपली विघ्ने दूर करतो. आपण जर श्रीगणपतीच्या भौतिक रूपाकडे आकर्षित झालो तर आपल्या भौतिक इच्छा पूर्ण करण्यामध्ये जी विघ्ने येतात ती दूर होतात आणि त्यांच्या आध्यात्मिक रूपाकडे आकर्षित झाल्यास आपल्याला आध्यात्मिक मार्गावर येणारी विघ्ने दूर करतात. वास्तविक श्रीगणपतीसारख्या देवतांची इच्छा असते की आपण आध्यात्मिक मार्गावर प्रगती करावी. दुर्दैवाने आजकाल योग्य मार्गदर्शनाअभावी लोकांना गणपतीकडून काय मागावे हेच माहीत नाही. श्रीगणपतीच्या आरतीतला एक महत्त्वाचा भाग ‘संकटी पावावे निर्वाणी रक्षावे’ हे नीटपणे समजून घेतल्यास याचा उलगडा होईल. आपल्या जीवनातील खरे विघ्न अथवा संकट हे निर्वाण म्हणजे मृत्यू आहे आणि या विघ्नापासून रक्षण करण्यासाठी आपण श्रीगणपतीची उपासना केल्यास आपल्या आध्यात्मिक जीवनात मदत होईल. निर्वाणी म्हणजे मृत्यूपासून कोण आपल्याला वाचवू शकतो हे श्रीगणेश भगवतगीतेमध्ये सांगतात. व्यासदेवांच्या कथनानुसार श्रीगणेशानी महाभारतातील एक भाग भगवतगीता सांगताना लिहिले आहे की भगवान श्रीकृष्ण म्हणतात तेषामहंसमुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् । भवामि न चिरात्पार्थ मय्यावेशितचेतसाम् । (भ गी 12.7) अर्थात ‘जे माझ्या ठायी मन स्थिर करून भक्तीमध्ये संलग्न होतात व माझेच ध्यान करीत असतात, त्यांचा हे पार्था, मी जन्ममृत्युरूपी संसारसागरातून त्वरित उद्धार करतो.’ अशाप्रकारे हे मृत्यूचे संकट दूर करण्यासाठी श्रीगणेशाच्या कृपेने आपण आध्यात्मिक जीवनात प्रगती करू शकतो.
श्रीगणपती हे त्यांचे मातापिता शंकरपार्वतीप्रमाणेच शुद्ध वैष्णव म्हणजे विष्णूचे भक्त आहेत. एक वैष्णव या नात्याने स्वाभाविकपणे त्यांना जीव मनुष्य जन्म प्राप्त झाल्यावरही जन्म, मृत्यू, जरा, व्याधी या दुःखांचा परिहार न करता भौतिक इंद्रियतृप्तीमध्ये मग्न असल्याचे पाहून दुःख होते आणि या दुःखातून सर्वाना मुक्त करण्यासाठी ते स्वखुशीने भक्तांच्या जीवनातील आध्यात्मिक मार्गावर येणारी दुःखे दूर करण्याची सेवा स्वीकारतात. या कार्यासाठी त्यांना सामर्थ्य कोठून मिळते, या प्रश्नाचे उत्तर ब्रह्मसंहितेमध्ये मिळते. यत्पादपल्लवयुगं विनिधाय कुम्भ द्वंद्वे प्रणामसमये स गणाधिराजः । विघ्नान् विहन्तुमलमस्य जगत्रयस्य गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि अर्थात ‘श्रीगणेशांनी भक्तीतील सर्व विघ्नांचा नाश करणाऱया भगवान श्रीगोविंदाचे चरणकमल आपल्या मस्तकावर धारण केल्याने त्यांनाही हे आध्यात्मिक जीवनातील विघ्ने हरण करण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे.’ त्याचप्रमाणे आपल्यासारख्या कलियुगातील मंद बुद्धी असलेल्या जीवांना श्रीगणेशांनी आणखी एक वरदान दिले आहे. या युगाच्या आरंभी सर्व वेद, उपनिषदे, इतिहास, पुराणे इत्यादी सर्व वैदिक साहित्य सारांश रूपाने प्रस्तुत करण्याची वेदव्यासांची इच्छा होती. ब्रह्मदेवांनी या कार्याची स्तुती करत व्यासदेवाना हे कार्य करण्यासाठी आशीर्वाद दिला. यस्य काव्यस्यं कवयो न समर्था विशेषणे (महाभारत आदी 1.03) ‘या संपूर्ण विश्वातील सर्वश्रे÷ कवीदेखील तू करीत असलेल्या या रचनेची बरोबरी करू शकणार नाहीत’. यानंतर त्यांनी व्यासदेवाना ही रचना लेखांकित करण्यासाठी श्रीगणपतीची मदत घेण्यास सांगितले. व्यासदेवांकडे शुकदेव गोस्वामीसारखा अत्यंत विद्वान असा पात्र पुत्र आणि वैशंपायनसारखे अत्यंत पात्र शिष्य असले तरी
ब्रह्मदेवाने हे कार्य पार पाडण्यासाठी श्रीगणेशांची मदत घेण्याचा सल्ला दिला. यावरून श्रीगणेशाच्या आध्यात्मिक स्थितीविषयी आपण जाणू शकतो. या संदर्भात महाभारतात (आदिपर्व 1.78-79) उल्लेख येतो. श्रुत्वेतटप्राह विघ्नेशो यदी मे लेखांनी क्षणम । लिखतो नावति÷sत तदा स्याम लेखको ह्याहम ।। अर्थात ‘हे ऐकून गणेश म्हणाले, हे व्यासदेव! एका अटीवर मी हे कार्य करण्यास तयार आहे, लिखाण करताना माझी लेखणी क्षणभरासाठीही थांबली नाही पाहिजे.’ व्यासोऋप्युवाच तं देवम बुद्ध्वा मा लिख कचित । ओम इत्युक्तवा गणेशोप्यभुव किल लेखकः।। अर्थात ‘यावर व्यास म्हणाले, माझ्या मुखातून बाहेर पडणाऱया प्रत्येक विधानाचा अर्थ समजल्याखेरीज तू एकही शब्द लिहू नये. यानंतर श्री गणेशाने ओंकाराचा उच्चार करून या अटीनुसार लिखाण करण्यास तयारी दर्शविली’.
या संपूर्ण प्रसंगामध्ये श्रीगणेशांच्या अटीवर व्यासदेवानी घातलेली अट वेदातील अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर प्रकाश टाकण्यास मदत करते. महाभारतात मुख्यतः श्रीकृष्णांचे निस्सीम भक्त असणाऱया पांडवांची कथा सांगण्यात आली आहे. अनेक बिकट परिस्थितीतदेखील पांडवांनी कशाप्रकारे श्रीकृष्णांवरील आपली श्रद्धा ढळू दिली नाही यांची अनेक उदाहरणे महाभारतात आढळतात. या महाभारताचाच एक भाग म्हणजे अर्जुनाचा भ्रम दूर करण्यासाठी श्रीकृष्णाने कालातीत असे भगवतगीतेचे ज्ञान सर्व मानवांसाठी दिले. भगवतगीतेमध्ये संपूर्ण वेदांचे ज्ञान साररुपात स्वतः श्रीकृष्णांनीच व्यक्त केले असून याचे वाचन किंवा श्रवण करणारा अगदी प्राथमिक स्तरापासून अध्यात्माच्या प्रगत स्तरापर्यंत उन्नत्ती करू शकतो. यामुळेच अध्यात्माचे परिपूर्ण ज्ञान देणारा ग्रंथ म्हणून भगवतगीता संपूर्ण जगात विख्यात आहे. भगवतगीतेत भगवान श्रीकृष्ण स्वतः पूर्ण पुरुषोत्तम भगवान असल्याचे सिद्ध करतात आणि या नात्याने त्यांचे इतर देवतांशी असलेले संबंध देखील स्पष्ट करतात. यामुळे वेदाध्ययन करणारा विद्यार्थी जाणतो की निरनिराळय़ा देवतांमध्ये कोणत्याही प्रकारचे शत्रुत्व अथवा स्पर्धा नाही. उलट, सर्व देवदेवता हे भगवंताच्या आदेशानुसार विश्वाचे व्यवस्थापन करण्याचे कार्य संपादन करतात. व्यासदेवांच्या अटीनुसार हे सर्व श्रीगणेशानी लिहिले आहे आणि लिहिताना समजून घेतले आहे आणि कोणताही आक्षेप व्यक्त केला नाही. त्यामुळे सामान्य लोकांनी वेदशास्त्रावर स्वतःचे तर्क न मांडता श्रीगणेशांच्या चरणचिन्हांचे अनुगमन करून जशी आहे तशी भगवतगीता आपल्या जीवनात पालन केल्यास खऱया अर्थाने श्रीगणेश प्रसन्न होतील.
वास्तविक सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात राष्ट्रात एकी निर्माण करून परकीय शत्रूविरुद्ध लढा देण्यासाठी आणि वैदिक संस्कृतीचे पालन व प्रचार करण्यासाठी झाली होती. परंतु आज परिस्थिती पूर्णपणे विपरीत उद्भवली आहे. सामान्य लोकांना कथा, कीर्तन, प्रवचन इत्यादी आध्यात्मिक कार्यक्रमाद्वारे जनजागृती करण्याऐवजी याच पवित्र उत्सवाच्या निमित्ताने लोक पाश्चात्य जगातील विकृत जीवनपद्धतीच्या पारतंत्र्यात स्वतःस लोटून देत आहेत. आजकाल रात्रभर चालणारे गणेशोत्सवातील कार्यक्रम हे डिस्को पार्टीप्रमाणे प्रतीत होतात. ध्वनिक्षेपकावर कर्कश आवाजात वाजवली जाणारी गणपतीशी कोणताही संबंध नसणारी सिनेमातील अर्थहीन गाणी, त्याच्या जोडीला विकृत अंगविक्षेप करत नशेच्या धुंदीत केले जाणारे हिडीस नृत्य, जुगार असे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली असंस्कृत कृत्य गणेशोत्सवाच्या नावाखाली चालू आहेत. अशा कृत्यामुळे श्रीगणपती प्रसन्न होतील अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे आणि पैसे, वेळ खर्च करून धर्माच्या नावाने अधर्म केल्यासारखे आहे.
सारांशतः गणेश भक्तांनी भगवंताची अथवा महान देवीदेवतांची पूजा करताना वैदिक परंपरेनुसार योग्य भक्तिभाव ठेवावा आणि वैदिक पद्धतीनुसार श्रीगणेशाची पूजा करावी. आपण गणेशाची आरती करताना जे म्हणतो ‘संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना’ ह्याचा अर्थ वर लिहिल्याप्रमाणे समजून घेऊन त्याप्रमाणे गणेशोत्सवात आणि जीवनात पालन करावे. प्रामाणिक भक्तांनी एकत्र येऊन आजकाल अयोग्यपणे साजरा केला जाणाऱया गणेशोत्सवातील कार्यकर्त्यांसमोर आणि सामान्य लोकांसमोर वेदिक परंपरेनुसार आध्यात्मिक उन्नतीकरिता जनजागृती करणारे कार्यक्रम आयोजित करून समाजापुढे आदर्श ठेवावा.
-वृंदावनदास









