शोकसभेत मंत्री सुदिन ढवळीकरांनी व्यक्त केल्या भावना
मडकई : नाट्यादिग्दर्शक, मूर्तिकार, चित्रकार अशा अनेक कलांमध्ये उल्लेखनीय योगदान दिलेल्या स्व. शशिकांत विनायक नागेशकर यांचे कलेच्या क्षेत्रातले स्वप्न व ध्यास पुर्णत्त्वाकडे नेला जाईल. त्यासाठी त्यांच्या नावाने नागेशीत नाट्यामहोत्सव साजरा केला जाईल. तसेच त्यांनी घडविलेल्या नाट्या व कला क्षेत्रातील युवा कलाकारांना व्यासपीठ मिळव देण्यात येईल. त्यांना सर्वार्थांने हीच खरी श्रद्धांजली ठरेल, असे वीजमंत्री तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर म्हणाले. दिवंगत शशिकांत नागेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बांदोडा पंचायतीच्या सभागृहात रविवारी आयोजित केलेल्या शोकसभेत मंत्री ढवळीकर बोलत होते. मगो पक्षाचा कार्यकर्ता असलेल्या स्व. शशिकांत यांनी विधानसभेच्या प्रत्येक निवडणूकीच्या प्रचारसभेच्यावेळी अलौलीक कार्य केले. पण कधीच स्वत:साठी काही मागितले नाही. इतरांची कामे व्हावीत हीच त्यांची मनिषा असायची. पंचायत निवडणुकीत उमेदवारी द्या अशी मागणीही त्यांनी कधी केली नाही. नागेश देवस्थानच्या सार्वजनीक भजनी सप्ताहाच्यावेळी व महालक्ष्मी देवस्थानामध्ये होणाऱ्या भजनी सप्ताहात त्यांची कायम उणीव भासणार आहे. समाजाच्या उन्नतीसाठी झटणारा नाट्याकर्मी स्व.शशिकांत मगो पक्ष व आपल्या स्मरणात कायम राहील. नाट्याकर्मी अजीत केरकर म्हणाले, स्व. शशिकांत नागेशकर यांच्या घरातूनच बहरलेल्या कलेचे दर्शन अगदी लहानपणा पासून त्यांनी घेतले. उत्सवी रंगभूमीवर नट म्हणून काम करताना पहिली रंगभूषा त्यांचे वडील स्व. विनायक नागेशकर यांनी केली होती. नवरात्रोत्सवातील मखर सजावट, कार्तिक पौर्णिमेला हमखास ताशा वाजवणारा, घराघरातील त्याची साजवटीतली कलाकुसर, नागेश व महालक्ष्मी देवस्थानातले त्यांचे कार्य अशा अनेक ठिकाणी शशिकांतचा अभाव जाणवेल. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरुन येणार नाही.
नाट्याकर्मी श्रीधर कामत बांबोळकर म्हणाले, मराठी व कोकणी नाटकातही शशिकांत यांनी अभिनय केला होता. त्यामुळे भाषेसंदर्भात त्यांचा कधीच वाद नव्हता. चौसष्ट कला अंगी असलेले ते व्यक्तमत्त्व होते. पण कधीही पुरस्कारासाठी त्यांनी प्रयत्न केले नाहीत. मात्र पुरस्कार मिळवण्यापेक्षा त्याचे कर्तृत्व आभाळा एवढे आहे. मरणोत्तर तरी त्यांना राज्य पुरस्कार मिळाला अशी सर्व कलाकारांची अपेक्षा आहे. निवेदक, तंत्रज्ञकार व कलाकार अशोक नाईक यांनी स्व. शशिकांत नागेशकर यांच्या स्मृतींना उजाळा देताना, स्वत:च्या अंगातल्या कलेला स्वत:पुरते मर्यांदीत न ठेवता ती इतर कलाकारांना भरभऊन दिल्याचे सांगितले. या जगात आलेला प्रत्येक माणूस स्वत:चे कार्य करुन जगाचा निरोप घेत असतो. तसाच स्व. शशिकांत हा पंढरपुरच्या वारीला निघालेला असला हे जरी सत्य असले तरी पंढरपुरच्या निमित्ताने तो अनंताच्या प्रवासाला गेला होता. कलाकार तथा निवृत्त अधिक्षक अभियंते दिलीप ढवळीकर यांनी स्व. शशिकांत नागेशकर यांचा ढवळीकर कुटुंबीयाशी अत्यंत जवळचा संबध असल्याचे सांगितले. त्यांच्या अष्टपैलू कार्यातून शशिकांत हे काम स्मरणात राहतील. ‘वाटलं नव्हतं अस कुणालाही असं अघटीत घडून जाईल. पंढरीची वाट चालता चालता विठू माऊलीचा गजर गाताना देव तुम्हाला घेऊन जाईल.’ आयुष्याच्या प्रत्येक वळणावर शकिकांतचा अभाव असेल. म्हणून ही पोकळी कधीही भरुन निघणार नाही, असे ते म्हणाले. साहित्यिक एन. शिवदास, कलाकार शशिकांत नाईक, ज्ञानेश्वर वारकरी मंडळातर्फे प्रभाकर नाईक, गुरुदास बांदोडकर, व राधाकृष्ण बांबोळकर आदीनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.









