वेंगुर्ले (वार्ताहर)-
आपण निवडणुकीच्या रिंगणात जिंकण्याचा निश्चय करूनच उतरायचे समोरचा किती ताकदवान आहे, यापेक्षा आपल्या जवळ असलेल्या युक्तीचा वापर करून करून निवडणूक जिंकायची असते धनशक्ती पेक्षा जनशक्ती ही श्रेष्ठ मानली जाते. लोकांनी एकदा जर ठरवलं तर ते भल्याभल्यांना घरी बसवतात सध्याची परिस्थिती ही तशीच आहे. असे प्रतिपादन उबाठा शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी वेंगुर्ले येथे केले.येथील वेंगुर्ला तालुका शिवसेना उबाठा सेनेची मासिक सभा शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
श्री. पडते पुढे म्हणाले, आपल्या पक्षाप्रती आणि उत्तम प्रशासन हाताळणारे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्याप्रती लोकांची सहानुभूती असून लोक भाजपच्या घाणेरड्या राजकारणाला कंटाळली आहेत तेव्हा आपण जनतेसमोर जाताना या शासनाने फसव्या घोषणा करून महागाई कशी वाढवली याची उदाहरणे देऊन शेतकऱ्यांना अजून पिक विम्याची रक्कम मिळाली नाही, सोसायटीचे नियमित कर्जफेड करणाऱ्या सभासदांना प्रोत्साहन निधी नाही, घरकुल योजनेच्या प्रतिक्षेत असलेल्या गरीबांना घरे मंजूर नाहीत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई दिली नाही आणि हे सरकार फक्त जाहीरातबाजी करून लोकांची दिशाभूल करून दडपशाहीचा कारभार करत आहेत. हे विषय गावागावात जनतेसमोर सांगून अशा भाजप सरकारला कायमचं हद्दपार करायचे आहे.
या मासिक सभेत संघटनात्मक बांधणी व होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूक या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेअंती मार्गदर्शन करताना संजय पडते यांनी, ग्रामपंचायत निवडणूक असलेल्या गावात स्थानिक पातळीवर बैठक घेऊन उबाठा सेनेचे पॅनल तयार करून फॉर्म भरण्यास सुरुवात करावी अशा सूचना करून आवश्यक आहे त्या ठिकाणी आपण विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब जिल्हा समन्वयक बाळा गावडे महिला जिल्हा संघटक सौ. जान्हवी सावंत यांना सोबत घेऊन महत्वपूर्ण बैठका घेऊन गावा गावात भगवा फडकवू असा विश्वास करीत सर्व पदाधिकारी यांना सर्वांना प्रोत्साहन दिले.यावेळी उपजिल्हाप्रमुख प्रकाश गडेकर, तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळु परब, महिला तालुका संघटक सौ. सुकन्या नरसुले, एस.टी. कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय गावडे, शहर प्रमुख अजित राऊळ, माजी नगराध्यक्ष संदेश निकम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.









