पुणे / प्रतिनिधी :
स्थैर्याबरोबरच प्रादेशिक सुरक्षेला चालना देण्यासाठी आणि संरक्षण क्षमता वाढविण्याकरिता भारत आफ्रिकी राष्ट्रांसोबत एकत्रितपणे काम करणार असल्याची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी दिली.
महाराष्ट्रात पुणे येथे 28 मार्च 2023 रोजी दुसऱ्या आफ्रिका-भारत संयुक्त सराव ‘AFINDEX’ च्या पार्श्वभूमीवर आयोजित भारत-आफ्रिका लष्करप्रमुखांच्या पहिल्या परिषदेत ते बोलत होते. या वेळी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे आणि 31 आफ्रिकी राष्ट्रांचे प्रमुख आणि प्रतिनिधी तसेच इतर नागरी आणि संरक्षण क्षेत्रातील मान्यवर या परिषदेला उपस्थित होते.
राजनाथ सिंग म्हणाले, सशस्त्र दलांच्या क्षमता वाढीसह आर्थिक वाढ आणि सामाजिक विकास सुनिश्चित करण्यासाठी संरक्षण संबंधित सर्व बाबींमध्ये आफ्रिकी भागीदार देशांना पाठिंबा देण्यासाठी भारत वचनबद्ध आहे. एकविसाव्या शतकातील संरक्षणविषयक आव्हानांना तोंड देण्यासाठी आफ्रिकी राष्ट्रांच्या सशस्त्र दलांना प्रशिक्षण देण्यात आणि त्यांना आवश्यक कौशल्याने सुसज्ज करण्यात देश आघाडीवर आहे. प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये बंडखोरीविरोधी कारवाया, शांतता राखणे, सागरी सुरक्षा, सायबर युद्ध, ड्रोन कारवाया यांसारख्या नवीन क्षेत्रातील विशेष प्रशिक्षणासह विविध क्षेत्रांचा समावेश आहे. भारत आणि आफ्रिकी राष्ट्रांमधील संयुक्त सराव सशस्त्र दलांना एकमेकांकडून शिकण्याची आणि आंतरकार्यक्षमतेला प्रोत्साहन देण्याची उत्कृष्ट संधी आहे.
हिंद महासागराने जोडलेले सागरी शेजारी म्हणून, सागरी सुरक्षा, जलविज्ञान, दहशतवाद आणि अतिरेक्मयांना विरोध करणे आदी मुद्यांवर आपले सहकार्य प्रादेशिक शांतता आणि समृद्धीसाठी आवश्यक असेल. आपली संरक्षणविषयक गरज भागविण्यासाठी भारतीय बनावटीचे लष्करी साहित्य आणि तंत्रज्ञान कसे उपयुक्त ठरू शकेल, याची माहिती आफ्रिकन देशांना करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
संस्थात्मक आराखडयाची उभारणी महत्त्वाची
भारतीय आणि आफ्रिकन देशांमध्ये भारतीय संरक्षण उद्योगाच्या प्रगतीबरोबरच संयुक्त प्रशिक्षण आणि लष्करी सहकार्य यामार्फत एका संस्थात्मक आराखडय़ाची उभारणी करणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून संयुक्त लष्करी प्रशिक्षण, शांतता मोहिमा आखता याव्यात. भारत आणि आफ्रिकन देशांमधील स्थानिक स्तरावरील सहकार्याला खतपाणी घालण्याबरोबरच प्रादेशिक सहकार्य वाढविण्यासाठी भारत आणि आफ्रिका राष्ट्रांमध्ये आधीपासून असलेल्या संरक्षण संबंधांचा हा एक महत्त्वाचा पैलू असल्याचेही राजनाथ सिंग यांनी सांगितले.









