अध्याय पंचविसावा
भगवंत म्हणाले, मनुष्य जे जे पहातो किंवा ऐकतो, किंवा ज्याचे ज्याचे चिंतन करतो, ते ते सारेच मायेच्या गुणांच्या कार्याने त्रिगुणात्मकच झालेले आहे असे समजावे. प्रकृती आणि पुरुष यांच्या एकत्र येण्यातून हे त्रिगुणात्मक विश्व तयार झालेले आहे. ह्या तीन गुणांचे निरसन करण्याचे काम प्रकृतीचा नियंता असलेला परमपुरुष करत असतो. तो प्रकृतीपासून भिन्न आहे. तो सदासर्वदा सर्वांगाने निर्गुण असून सर्व गुणांवर त्याचीच सत्ता चालते. उद्धवा! आता तुझ्या लक्षात आले असेलच की, ज्यांना मनुष्यदेह प्राप्त झालेला आहे ते जर या गुणांना भुलून त्यातच गुंतून पडले तर ते मायेकडून ठकवले गेले असे समज. उद्धवा समोरचा आपल्याला फसवणार आहे हे माहित असूनही जो त्याच्या सांगण्याला, कृतीला भुलतो आणि त्याने सांगितले तसे करतो त्याला ठकले जाणे असे म्हणतात.
हा अनुभव मनुष्य गेले कित्येक जन्म घेत असून सुद्धा, तो पुनःपुन्हा गुणात गुंतून पडतो आणि त्याचा नरजन्म वाया घालवतो. त्रिगुणातून बाहेर पडण्यासाठी माझी भक्ती करून गुणातीतता साधण्याचा जे प्रयत्न करत नाहीत, ते स्पष्टपणे मायेकडून नाडले जातात. स्वार्थ म्हणजे स्वतःचा फायदा करून घेणे. आतापर्यंतच्या विवेचनावरून तुझ्या लक्षात आले असेलच की, माणसाचा खरा स्वार्थ किंवा फायदा त्रिगुणातीत होण्यातच आहे. त्यामुळे जे असा प्रयत्न करत नाहीत, त्यांचा स्वार्थ बुडाला म्हणून समज. भगवंतांच हे बोलणं ऐकून उद्धव काहीसा चिंतातूर झाला कारण गुणातीत होणं हे सहज सोपं नाही हे त्याच्या लक्षात आलं. त्याची चिंतातूर मुद्रा बघून भगवंताना त्याच्या मनातली गोष्ट समजली म्हणून ते म्हणाले, तुझी बुद्धी काही तशी नाही. तू भगवद्भक्तीचा अंगीकार केलास, त्याच वेळेस तू खरोखर गुणातीत झालास.
भगवंतांच्या या बोलण्यावरून असा निष्कर्ष निघतो की, जो मनापासून निरपेक्षतेने भगवद्भक्ती करतो, तो गुणातीत झालेलाच असतो. उद्धव हा हरिभक्तांमध्ये श्रे÷ होता, म्हणून भगवंत त्याला तू थोर भाग्याचा आहेस असे म्हणत आहेत. म्हणजेच थोर भाग्यवंत होण्यासाठी श्रे÷ हरीभक्त होणे आवश्यक आहे. अशा या श्रे÷ हरीभक्ताला भगवंत आता संसार वृक्षाबद्दल विशेष माहिती सांगत आहेत. ते म्हणाले उद्धवा, अहंकार आणि मी पणा किंवा देहबुद्धी म्हणजे सगळं मलाच हवं अशा विचारसरणीने या तीन गुणांचा खूपच विस्तार होतो. त्यामुळे संसारवृक्ष खालीवर तो चांगलाच फोफावतो. तो कापून टाकल्याशिवाय निर्गुण होताच येत नाही. तो छेदण्याचा प्रकार कसा आहे, ते सांगतो. ऐक, जीवाला योनी किंवा गती त्या त्या गुणकर्मानुसार मिळतात. जो जीव चित्तात उत्पन्न होणाऱया काम, क्रोध, लोभ, मोहादी विकारांवर विजय मिळवतो, भक्तियोगाने माझ्यामध्ये नि÷ा ठेवतो तो माझे स्वरूप प्राप्त करून घेतो परंतु असे होण्यात अडचण कुठे येते ते समजून घे. सत्वादी तिन्ही गुण, शुद्ध असोत की एकमेकात मिसळलेले असोत, ते पुरुषाला कर्म करायला भाग पाडून फळाच्या आशेत गुंतवतात आणि पाप पुण्याच्या बंधनात अडकवून बद्ध करून संसारी बनवितात. प्रत्यक्षात जीव हा मुक्त असतो पण फळाच्या आशेत गुंतून पडल्याने त्याला स्वतःला तो बद्ध आहे असे वाटते. ज्याप्रमाणे घडय़ातील पाण्यात सूर्याचे प्रतिबिंब पडल्यावर त्यातच सूर्य आहे असे वाटते, त्याप्रमाणे ह्या तीन गुणकांमुळेच जीवाला दृढतर बंधन प्राप्त झाले आहे असे वाटते. हे वाटणे हा सुद्धा एक भ्रमच आहे.
ज्याप्रमाणे घागरीत गढूळ पाणी भरले असले तर, त्यामध्ये पडलेले सूर्याचे प्रतिबिंबही मळकेच आहे असे दिसते किंवा घागरीतले पाणी हालत राहिले तर त्यातील, सूर्यबिंबही चळचळा कापू लागते. त्याप्रमाणे तीन गुणांचे जे कर्माचरण आहे, तेच शुद्ध ब्रह्माला जीवपणा आणते. म्हणून जीवाला पडलेले बंधन तोडण्याकरिता भगवद्भजन करावे. त्यासाठी सद्गुरूला शरण जावे. सद्गुरू हे माझेच रूप आहेत हे ध्यानात घेऊन सद्गुरूचे भजन केले असता अत्यंत शुद्ध असा सत्त्वगुण वाढतो. पायात लोखंडाची बेडी पडली, तर ती लोहार लोखडानंच तोडून काढतो, त्याप्रमाणे सत्त्वगुणाची वाढ झाली म्हणजे गुरुराजच तिन्ही गुणांना तोडून टाकतो.
क्रमशः