प्रतिनिधी /बेळगाव
पंचमसाली समाजाला 2-ए आरक्षण जाहीर करावे, या मागणीसाठी सोमवार दि. 27 जून रोजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या शिग्गाव येथील निवासस्थानासमोर धरणे धरण्यात येणार आहे. कुडलसंगम येथील पंचमसाली पीठाचे जगद्गुरु बसवजयमृत्यूंजय स्वामीजींनी शुक्रवारी बेळगाव येथे ही माहिती दिली आहे.
27 जूनपर्यंत आरक्षण देण्यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका जाहीर करावी. आयोगाने मनात आणले तर महिन्याभरात अहवाल देता आला असता. वेगवेगळी कारणे पुढे करून आयोगाने आणखी 8 महिन्यांची मुदत मागितली आहे. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या कारकिर्दीत या आयोगाची स्थापना झाली. आरक्षण जाहीर करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचे स्वामीजींनी सांगितले.
यावेळी माजी मंत्री ए. बी. पाटील, विनय कुलकर्णी, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, ऍड. एम. बी. जिरली आदींसह समाजाचे प्रमुख उपस्थित होते. पंचमसाली समाजाला 2-ए आरक्षण मिळावे यासाठी आपले आंदोलन आहे. अनेकवेळा मुख्यमंत्र्यांनी आश्वासने दिली आहेत.
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्यावर आमचा विश्वास आहे. तरीही आरक्षण जाहीर करण्याला विलंब होत असल्यामुळे 27 जून रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, याच मुद्दय़ावर कुडलसंगम ते बेंगळूरपर्यंत पदयात्राही झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी समाजाला आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी पंचमसाली मठाधिशांनी केली आहे.









