अलिकडच्या काळात माणसाची दानत कमी होत चालली आहे. ज्यांच्याजवळ भरपूर असते, असे लोकसुद्धा त्यातील काही भाग इतरांना देण्यास फारसे राजी नसतात. निरपेक्ष बुद्धीने दान, तर दुर्मिळच झाले आहे. काहीतरी परतावा मिळण्याची शक्यता असल्याशिवाय, किंवा किमानपक्षी प्रसिद्धी होणार असल्याशिवाय कोणीही कोणाला स्वत:जवळची संपत्ती सहसा देत नाही.
तथापि, बिहारमधील भागलपूर जिल्ह्यात एक शेतकरी असा आहे की ज्याने आपली 11 कट्टा (साधारणत: 20 गुंठे) भूमी गावच्या शाळेला दान केली आहे. सुबोध यादव असे या तरुण शेतकऱ्याचे नाव असून तो बिहपूर प्रखंडातील कहारपूर गावचा ग्रामस्थ आहे. काही वर्षांपूर्वी गावाजवळून वाहणाऱ्या कोसी नदीला पूर आल्याने गावातील शाळा वाहून गेली होती. ती नव्याने बांधायची होती.
सुबोध यादव याने पुढाकार घेऊन आपल्या मातेच्या सांगण्यावरुन आपली ही भूमी शाळेसाठी दान केली. नदीकाठच्या गावात असणारी ही भूमी सुपिक असूनही त्याने ती शिक्षणासारख्या पवित्र आणि उपयुक्त कार्यासाठी दान देऊन त्याने अन्यांसाठी एक आदर्श निर्माण केला असल्याने त्याची प्रशंसा होत आहे. विशेष म्हणजे त्याने आईच्या शब्दाचा मान ठेवला आणि तिने सांगितल्याबरोबर कोणतीही तक्रार न करता त्याने ही भूमी शाळेला दिली, असे उदाहरण अलिकडच्या काळात विराळाच म्हणावे लागेल. शाळा वाहून गेल्यानंतर शिक्षण विभागाने गावातच शाळेसाठी भूमी मिळते का याचा शोध घेतला होता. पण कोणीही ती दान केली नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांना दुसऱ्या गावातील लांबवर असणाऱ्या शाळेत जावे लागणार होते. ही अडचण ओळखून सुबोध याच्या आईने भूमी देण्याचा शब्द दिला होता. तो त्याने पाळला असून त्याची यासाठी पंचक्रोशीत प्रशंसा होत आहे.