अध्याय सहावा
मनुष्य योनीत मिळालेला जन्म ईश्वराचं स्वरूप जाणून घेण्यात माणसाने व्यतीत करावा अशी बाप्पांची इच्छा आहे. त्यासाठी गणेशतत्व समजून घ्यावे लागते. मागील अध्यायात योगाभ्यास कसा करावा ह्याबद्दल बाप्पांनी सविस्तर मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे ब्रह्म जाणून घेण्याच्या जिज्ञासेने साधकाने वैराग्यसंपन्न होऊन, शम, दम ह्यांच्यावर प्रभुत्व मिळवले की, त्याला योगसिद्धी प्राप्त होते. त्याचे अंत:करण शुद्ध होते. ह्या अवस्थेमध्ये तत्वज्ञानविचार साधावा लागतो. गणेशतत्व समजून घेणे हे महत्त्वाचे असते. या अध्यायात बाप्पा श्रीगणेशतत्व कसे जाणून घ्यायचे याबद्दल मार्गदर्शन करत आहेत. पहिल्या श्लोकात ते म्हणतात, ज्याचे अंत:करण माझ्या ठिकाणी स्थिर होते त्याला माझे स्वरूप समजते आणि त्यामुळे तो मुक्त होतो.
ईदृशं विद्धि मे तत्त्वं मद्गतेनान्तरात्मना । यज्ञात्वा मामसन्दिग्धं वेत्सि मोक्ष्यसि सर्वगम् ।। 1 ।।
अर्थ – माझ्या ठिकाणी अंत:करण लावून माझे तत्त्व म्हणजे माझे यथार्थ स्वरूप जाणल्याने सर्वव्यापी अशा मला तू संशयरहित होऊन जाणशील आणि मुक्त होशील.
विवरण-बाप्पा राजाला सांगतायत की, अनित्य, दु:खरूप विश्वात आल्यानंतर विषयांच्या भूलभूलय्यात न अडकता माझे भजन कर, त्यातून माझं स्वरूप जसं आहे तसं जाणून घे. त्यासाठी अंत:करण माझ्याठायी स्थिर कर. अशा पद्धतीने तू जर मला जाणून घेतलंस तर तू मुक्त होशील. ज्याला हे समजलंय की, तो ईश्वरी अंश आहे आणि तीच त्याची खरी ओळख आहे तो प्रत्येकजण त्याच्यातला ईश्वरी अंश जाणून घेण्यास उत्सुक असतो. ईश्वराचं मूळ स्वरूप निर्गुण निराकार आहे. आपणही ईश्वरी अंश आहोत याचाच अर्थ आपलंही मूळ स्वरूप निर्गुण निराकार असायला हवं. हे लक्षात येऊ लागलं की, आजूबाजूच्या व्यक्ती, घटना व परिस्थिती यातून आपण ठेवत असलेल्या इच्छा आणि अपेक्षा निरर्थक आहेत हे लक्षात येते. आपण दिसणाऱ्या जगापैकी एक नसून भिन्न आहोत हे समजते व त्यानुसार विचारसरणी ठेवली की, निरपेक्षता हा आपला सहजस्वभाव होऊन कर्मबंधनातून मुक्त होऊन जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका होते. म्हणून बाप्पांचं यथार्थ स्वरूप म्हणजे सत्य स्वरूप जाणून घेतलं की, मुक्ती मिळते. एकप्रकारे ही गुरुकिल्ली बाप्पानी राजाच्या हातात दिलीये. या गुरुकिल्लीचा वापर करून आपण पुढील प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करूयात.
मी आणि ईश्वर जर एक आहोत तर मी त्यापासून वेगळा कसा?
मला जाणवणारे सुखदु:खादि विकार माझ्याठायी का जाणवतात?
मी जरी देहात दिसत असलो तरी ईश्वरस्वरूप कसा?
सर्व काही ईश्वरस्वरूप आहे हे मी कसे ओळखू?
बाप्पा म्हणतात, या प्रश्नांची उत्तरे मिळवणे हेच खरे तत्वज्ञान होय. ही उत्तरे मिळवण्यासाठी तू माझ्याठायी चित्त जडव. माणसाचे चित्त नेहमीच अमुक एक गोष्ट हवी असे त्याला वाटले की, ती कशी मिळेल याचे चिंतन करत असते. तुझे चित्त माझे सतत चिंतन करू लागले की, तुला माझा ध्यास लागेल आणि तुला माझे वेगळे स्मरण करण्याची गरज पडणार नाही. ज्याला केवळ माझीच आशा आहे, माझाच भरवसा आहे, माझाच आधार आहे असा अनन्य भक्त मला फार प्रिय आहे. त्याने स्वत:चे अस्तित्व पूर्णतया माझ्यात विलीन केलेले असते. त्याला माझ्या सर्वव्यापी स्वरुपाची पूर्ण कल्पना आलेली असते. अशा भक्ताला माझे तत्व लगेच लक्षात येते आणि वरील प्रश्नांची उत्तरे मिळतात. ही उत्तरे ज्याला मिळतात त्याला ईश्वराचं स्वरूप समजून येते.
क्रमश:








