शिवजयंती सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची घोषणा
मडकई : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असलेल्या फर्मागुडीच्या किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. या किल्ल्यासह तेथील स्व. भाऊसाहेब बांदोडकर पुतळा असलेले उद्यान तसेच श्री गोपाळ गणपती मंदिरला जोडून धार्मिक पर्यटनस्थळ उभारण्यासाठी मास्टर प्लॅनची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. काल रविवारी फर्मागुडी येथील राज्यस्तरीय शिवजयंती सोहळ्यात ते बोलत होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वाऊढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण कऊन अभिवादन केले. पोर्तुगीज राजवटीत उद्ध्वस्त करण्यात आलेल्या प्राचिन मंदिरांचे पुनर्निर्माण केले जाणार असून शिवाजी महाराजांनी जिर्णोद्धार केलेल्या नार्वे डिचोली येथील श्री सप्तकोटेश्वर मंदिरापासून त्याची सुऊवात झाली आहे. मडकईचे आमदार तथा मंत्री सुदिन ढवळीकर यांनी फर्मागुडी किल्ल्याच्या पुनर्बांधणीचा मास्टर प्लॅन तयार केला आहे. त्याला येणाऱ्या अंदाज पत्रकात मान्यता देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.
अंत्रुज महालाला विकसित करणार
देवभूमी अंत्रुज महालाला धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून विकसित केले जाईल. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनिती, व्यवस्थापन व त्यांचे गोमंतकासाठी असलेले योगदान हा इतिहास पुढील पीढीला कळावा यासाठी ऐतिहासिक किल्ल्याचा विकास साधला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिव छत्रपतींची 393 वी जयंती
शिव छत्रपतींची यंदा ही 393 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गोपाळ गणपती मंदिरच्या प्रांगणात हा सोहळा पार पडला. माहिती व प्रसिद्धी खाते, बांदोडा पंचायत व कवळे जिल्हा पंचायत यांच्यातर्फे आयोजित केलेल्या या सोहळ्याला कृषीमंत्री रवी नाईक, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, सावर्डेचे आमदार गणेश गांवकर, बांदोडाचे सरपंच सुखानंद कुर्पासकर, कवळे जिल्हा पंचयत सदस्य गणपत नाईक, फोंड्याचे नगराध्यक्ष रितेश नाईक, माहिती व प्रसिद्धी खात्याचे सचिव सुभाष चंद्रा, माहिती खात्याचे संचालक दीपक बांदेकर व प्रमुख वक्ते इतिहास अभ्यासक डॉ अमर अडके आदी मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती भारतवर्षाचे आदर्श राजे
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ गोवा व महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारतवर्षाचे आदर्श राजे होते. त्यांची जीवनगाथा म्हणजे देशवासियांसाठी महान घटना होय. त्यांनी स्थापन केलेले राज्य हे आदर्श असे सुराज्य होते. गोव्याचा इतिहास व शिवरायांचे जवळचे नाते आहे. पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांचा जिर्णोद्धार शिवरायांनी केला होता. त्यांच्यामुळेच मंदिरे व हिंदू संस्कृती टिकून राहिली. शिवराय ही व्यक्ती नसून तो विचार आहे. हा विचार प्रत्येक मनामनात ऊजला पाहिजे असे पुढे बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
महाराजांचा इतिहास भविष्याचा वेध घेणारा
प्रमुख वक्ते कोल्हापूर येथील डॉ. अमर अडके यांनी शिव छत्रपतींच्या जीवनातील काही महत्त्वाचे कंगोरे आपल्या भाषणातून शिवप्रेमींसमोर मांडले. शिवरायांचा इतिहास हा वर्तमानाच्या पलिकडे जाऊनही भविष्याचा वेध घेणारा आहे, हे सांगताना त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण वर्क्तृत्वातून छत्रपती शिवराय व गोव्यासंबंधी काही ऐतिहासिक घटनांचे संदर्भ सांगितले.
शिवरायांचे विचार व सिद्धांताचे आचरण व्हावे
मंत्री गोविंद गावडे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 50 वर्षांच्या आयुष्यात आदर्श राज्य निर्माण केले. शिवरायांचा इतिहास हा साहस व स्वाभिमानाने भरलेला आहे. त्यांचे विचार व सिद्धांताचे आचरण नवीन पिढीने करावे. शिवरायांचा इतिहास समजून घेण्यासाठी शिवचरित्राचे वाचन अनिवार्य असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे महत्त्व त्यांचे कार्य व गोव्यासाठी त्यांचे योगदान अधोरेखित करण्यासाठी फर्मागुडीच्या किल्याचा मास्टर प्लॅन तयार केलेला आहे. त्यासाठी ऊ. 24 कोटींची तरतूर करण्यात आली होती. वास्तुविशारद अभिजित साधले यांनी त्याचा आराखडा तयार केलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याला मान्यता देऊन या वर्षीच्या अर्थसंकल्पात त्याला मंजूरी देण्याचा प्रस्ताव मांडला. स्वागत व प्रास्ताविक सुखानंद कुर्पासकर यांनी केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय दीपक बांदेकर यांनी कऊन दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश वेळगेकर यांनी तर गणपत नाईक यांनी आभार मानले. मान्यवरांच्या स्वागतासाठी ढोलताशा वादनासह फर्मागुडी किल्ल्यापासून गोपाळ गणपती मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी बाल भवनच्या विद्यार्थ्यांनी पोवाडे व स्वागतगीत सादर केले. मुख्य कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांसाठी शिवरायांच्या जीवनावर आधारीत वेशभूषा, प्रश्नमंजुषा व नाट्या प्रवेश स्पर्धा घेण्यात आली. रात्री श्रीमान योगी हा नाट्याप्रयोग सादर करण्यात आला.









