प्रतिनिधी/ बेळगाव
किल्ला तलावात उडी टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेला वाहतूक पोलिसांनी वाचविले. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली असून त्या महिलेची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शिवलीला (वय 42) असे त्या महिलेचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी 4.30 ते 5 यावेळेत किल्ला तलावात तिने उडी घेतली. हा प्रकार पाहणाऱ्या नागरिकांनी तिला वाचविण्यासाठी आरडाओरड सुरू केली. याच परिसरात सेवेत असलेले वाहतूक उत्तर विभागाचे पोलीस काशिनाथ इरगार यांना ही माहिती देण्यात आली.
पोलीस आयुक्तांच्या सूचनेवरून किल्ला तलावापासून गांधीनगरकडे अवजड वाहनांना सध्या प्रवेशबंदी आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी याच परिसरात सेवेत असलेल्या काशिनाथ यांनी तातडीने किल्ला तलाव परिसरात धाव घेतली. त्यावेळी शिवलीला गटांगळ्या खात होती. काहीजण पोहता येत नसल्यामुळे हा प्रकार पहात उभे होते.
काशिनाथ यांनी आपल्या अंगावरील गणवेशासह किल्ला तलावात उडी घेतली व त्या महिलेला पाण्याबाहेर काढले. त्यानंतर तिला रुग्णवाहिकेतून उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. तिची जबानी घेण्यासाठी सायंकाळी मार्केट पोलीस सिव्हिल हॉस्पिटलला पोहोचले होते. कौटुंबिक त्रासातून तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली आहे.
शिवलीलाचे माहेर ऑटोनगर परिसरात आहे. तर सासर बैलहोंगल तालुक्यातील चिवटगुंडी येथील आहे. जाचामुळे ही महिला चार दिवसांपूर्वी आपल्या माहेरी आली होती. तिने शनिवारी सायंकाळी तलावात उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला असून वाहतूक पोलिसाने दाखविलेल्या धाडसामुळे तिचा जीव वाचला आहे.
इरगार यांचा सोमवारी सत्कार
वाहतूक पोलीस काशिनाथ इरगार यांनी जीवाची पर्वा न करता आत्महत्या करणाऱ्या महिलेला वाचविले आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा, उपायुक्त शेखर एच. टी. आदी अधिकाऱ्यांनीही त्यांचे कौतुक केले असून सोमवारी त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.









