ऑनलाईन टीम / कोलकाता :
पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसमधील काही नेत्यांकडून बंड तीव्र केले जात आहे. आज आमदार सुवेंदू अधिकारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी यापूर्वी राज्य परिवहन मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
बंगालच्या २९४ सदस्यांच्या विधानसभेची निवडणूक पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात होणार आहे. निवडणुकीपूर्वीच ममता बॅनर्जी सरकारच्या अडचणी वाढत आहेत. पक्षाचे अनेक नेते ममता बॅनर्जींना लक्ष्य करत आहेत. सतत पक्षविरोधी वक्तव्य केल्यामुळे दोन दिवसांपूर्वीच पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील नेते कनिष्क पांडा यांना आज पक्षातून निलंबित करण्यात आले होते. तर आज एका आमदाराने राजीनामा दिला.
या राजीनाम्यावर भाजप उपाध्यक्ष मुकुल रॉय यांनी म्हटले आहे की, ज्या दिवशी सुवेंदू यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला त्या दिवशी मी म्हणालो होतो की, जर ते तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडले तर मी खूष असेन आणि आम्ही त्याचे स्वागत करू. आज त्यांनी पश्चिम बंगाल विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे आणि त्यांच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. तृणमूल काँग्रेस पत्त्यांच्या घरासारखी कोसळत आहे. दररोज त्यांच्या पक्षाचा एक नेता आमच्या पक्षात सामील होण्यासाठी येईल.









