अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम : कॅरोलिना मुचोवा, मॅडिसन किज यांचे आव्हान उपांत्य फेरीत समाप्त
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
2023 च्या टेनिस हंगामातील येथे सुरू असलेल्या शेवटच्या अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत अमेरिकेची 19 वर्षीय कोको गॉफ आणि बेलारुसची द्वितीय मानांकित आर्यना साबालेंका यांनी महिला एकेरीची अंतिम फेरी गाठली आहे. शनिवारी गॉफ आणि साबालेंका यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.
या स्पर्धेतील झालेल्या महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात अमेरिकेच्या कोको गॉफने झेक प्रजासत्ताकची कॅरोलिना मुचोवाचा 6-4, 7-5 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. या सामन्यावेळी हवामानाच्या समस्येमुळे सुमारे 50 मिनिटांचा वेळ वाया गेला. फ्लोरिडाची गॉफ या स्पर्धेत प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश केला असून ती आता ही स्पर्धा जिंकणारी सर्वात तरुण अमेरिकन टेनिसपटू ठरू शकेल पण तिला शनिवारच्या सामना साबालेंकावर विजय मिळवणे जरुरीचे आहे. 2022 च्या फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत गॉफला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. 2001 साली अमेरिकेची सेरेना विल्यम्स या स्पर्धेत जेतेपद मिळवणारी सर्वात कमी वयाची महिला टेनिसपटू ठरली होती.
या लढतीमध्ये गॉफला झेकच्या मुचोवाने दोन्ही सेट्समध्ये कडवी झुंज दिली. या सामन्यावेळी पहिला सेट गॉफने 6-4 अशा फरकाने जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये गॉफ 1-0 अशी आघाडीवर असताना प्रेक्षकातील चार व्यक्तींनी हुल्लडबाजी करून खेळात अडथळा आणल्याने काही वेळ हा सामना थांबवण्यात आला होता. लागलीच हुल्लडबाजी करणाऱ्या या चार व्यक्तींना सुरक्षा अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले पण टेनिस कोर्टच्या परिसरात जमिनीवर लोटांगण घेतलेल्या एका व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी मात्र बराच कालावधी लागला. दोन्ही टेनिसपटूंनी टेनिस कोर्टवरून सुरक्षा खोलीकडे आगेकूच केली. सामन्याला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर गॉफने मुचोवावर 6-5 अशी आघाडी मिळवली होती आणि पुढील गेममध्ये मुचावाकडे सर्व्हिस होती. गॉफला सामना जिंकण्यासाठी केवळ एका गुणाची जरुरी होती. दरम्यान मुचोवाने आपल्या सर्व्हिसवर फटका मारला पण गॉफला तो एकदा, दोनदा आणि तिसऱ्यांदाही परतावता आला नाही पण चौथ्यावेळी गॉफने या फटक्यावर विजयी गुण घेत मुचोवाचे आव्हान संपुष्टात आणले. अमेरिकेच्या गॉफचा हा सलग 11 वा विजय आहे. तिने अलीकडच्या कालावधीत 18 पैकी 17 सामने जिंकले आहेत. तिच्या या विजयी घोडदौडीला विम्बल्डन स्पर्धेनंतर प्रारंभ झाला होता. मात्र विम्बल्डनमध्ये गॉफला पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. गॉफ आणि मुचोवा यांच्या या उपांत्य सामन्याला सायंकाळी 7.15 वाजता सुरुवात झाला दरम्यान हवामान ढगाळ आणि हवेत गारठा जाणवत होता. या स्पर्धेत गेल्या बुधवारी अचानक उष्णतेची जाणीव झाली होती. सामन्याला सुरुवात झाल्यानंतर चालू वर्षीच्या टेनिस हंगामात चांगल्याच फॉर्ममध्ये असलेल्या गॉफने पहिल्या 10 मिनिटांच्या कालावधीत पहिल्या 16 पैकी 12 गुण घेत 27 वर्षीय मुचोवावर 3-0 अशी आघाडी मिळवली. गॉफने आपल्या अचूक वेगवान सर्व्हिस तसेच बेसलाईन खेळावर अधिक भर देत पहिला सेट 6-4 असा जिंकला. या सेटमध्ये मुचोवाला केवळ 4 गेम्स जिंकता आले. दरम्यान दुसऱ्या सेटमध्ये मुचोवाने गॉफला कडवी लढत देताना पाच गेम्स जिंकले पण गॉफने आपल्या वेगवान फटक्याच्या जोरावर मुचोवावर अधिक दडपण आणले आणि मुचोवाकडून वारंवार अनेक चुका झाल्याने तिला हा सामना गमवावा लागला.

या स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बेलारुसच्या द्वितीय मानांकित आर्यना साबालेंकाने अमेरिकेच्या मॅडिसन किजचा 0-6, 7-6(7-1), 7-6(10-5) असा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळवले. साबालेंकाने पहिल्यांदाच अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवणारी साबालेंका आता गॉफशी जेतेपदासाठी कडवी लढत देईल. या उपांत्य लढतीत मॅडिसन किजने आपल्या अचूक आणि वेगवान सर्व्हिसच्या जोरावर पहिला सेट केवळ 30 मिनिटामध्ये 6-0 असा जिंकून साबालेंकावर आघाडी मिळवली होती पण त्यानंतर किजला पुढील दोन सेटमध्ये आपल्या खेळामध्ये सातत्य राखता आले नाही. या लढतीतील दुसरा आणि तिसरा सेट ट्रायब्रेकरपर्यंत लांबला गेला पण साबालेंकाने आपल्या फटक्यामध्ये विविधता आणत किजला परतीचे फटके मारण्यासाठी कोर्टवर चांगलेच नाचवले. किजकडून वारंवार चुका झाल्याने तिची दमछाक झाली याचा फायदा 25 वर्षीय साबालेंकाने पुरेपूर घेत आपला शानदार विजय नोंदवला. अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेत किजने यापूर्वी म्हणजे 2017 साली अंतिम फेरी गाठली होती पण तिला स्लोनी स्टिफेन्सकडून पराभव पत्करावा लागला होता.









