प्ले-ऑफमधील स्थान निश्चित करण्यासाठी सज्ज, आरसीबीचे लक्ष्य विराटच्या फॉर्मकडे
मुंबई / वृत्तसंस्था
आयपीएल साखळी सामन्यात आज (शनिवार दि. 30) रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा संघ टेबलटॉपर्स गुजरात टायटन्सविरुद्ध मैदानात उतरेल, त्यावेळी त्यांचे मुख्य लक्ष्य विराट कोहली फॉर्ममध्ये परतणार का, याकडे असेल. या हंगामात 9 सामन्यात केवळ 128 धावा जमवू शकणारा विराट मागील सामन्यात सलामीला उतरुनही बॅड पॅचवर मात करु शकला नाही. या हंगामात 48 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. आरसीबी-गुजरात यांच्यातील ही लढत दुपारी 3.30 वाजता खेळवली जाईल.
या हंगामात विराट सलग दोन सामन्यात गोल्डन डकवर बाद झाल्यानंतर मागील सामन्यात त्याने सलामीला फलंदाजीला उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्या लढतीत देखील त्याला 9 धावांवर बाद होत परतावे लागले. कोहलीच्या खराब फॉर्मचा आरसीबीच्या प्रदर्शनावर देखील विपरीत परिणाम होत आला असून त्यांनी आतापर्यंत 9 सामन्यात 5 विजय नोंदवले आहेत.
दुसरीकडे, टायटन्सचा संघ आपल्या पदार्पणाच्या आयपीएलमध्येही एखाद्या अनुभवी संघाप्रमाणे कौशल्य पणाला लावून खेळत आला आहे. संघ अडचणीत असताना त्यांचा एक ना एक खेळाडू मॅचविनर ठरत आला आहे. या हंगामात गुजरातने आतापर्यंत 8 सामन्यात 7 विजय मिळवले असून त्यांनी सलग 5 विजयाची घोडदौड कायम राखली आहे. आजचा सामना जिंकला तर येथेच त्यांचे प्ले-ऑफमधील स्थानही निश्चित होईल.
यापूर्वी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध मागील लढतीत टायटन्सचा संघ 196 धावांचा पाठलाग करताना झगडत होता. मात्र, लेगस्पिनसाठी ओळखल्या जाणाऱया रशिद खानची यावेळी अचानक बॅट तळपण्यास सुरुवात झाली आणि पाहता पाहता गुजरातने विजय कवेत घेतला. आघाडी फळी कोसळली तरी मधली व तळाची फळी सर्व कसर भरुन काढू शकते, हे या संघाने अनेकदा दाखवून दिले आहे. टायटन्सतर्फे कर्णधार हार्दिक पंडय़ाने 7 सामन्यात 305 धावांची आतषबाजी केली असून शुभमन गिल, डेव्हिड मिलर व साहा देखील बहरात आहेत.
प्रतिस्पर्धी संघ
आरसीबी ः फॅफ डय़ू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, वणिंदू हसरंगा, दिनेश कार्तिक, जोश हॅझलवूड, शाहबाज अहमद, अनुज रावत, आकाश दीप, महिपाल लोमरोर, फिन ऍलन, शेरफेन रुदरफोर्ड, जेसॉन बेहरेनडॉर्फ, सुयश प्रभुदेसाई, चमा मिलिंद, अनिश्वर गौतम, कर्ण शर्मा, डेव्हिड विली, रजत पाटीदार, सिद्धार्थ कौल.
गुजरात टायटन्स ः हार्दिक पंडय़ा (कर्णधार), अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, गुरकिरत सिंग, बी. साई सुदर्शन, शुभमन गिल, राहुल तेवातिया, विजय शंकर, मॅथ्यू वेड, रहमनुल्लाह गुरबाझ, वृद्धिमान साहा, अल्झारी जोसेफ, दर्शन नळकांडे, डॉमिनिक ड्रेक्स, जयंत यादव, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, नूर अहमद, प्रदीप संगवान, रशिद खान, रवीश्रीनिवासन साई किशोर, वरुण ऍरॉन, यश दयाल.
सामन्याची वेळ ः दुपारी 3.30 वा.









