टायटॅनिकनजीक सापडले पाणबुडीचे अवशेष : 4 दिवसांपासून बेपत्ता होती पाणबुडी
► वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
टायटन पाणबुडीचे अवशेष अटलांटिक महासागरात आढळून आले आहेत. हे अवशेष टायटॅनिक जहाजाच्या अवशेषांनजीक सापडले आहेत. संबंधित पाणबुडीने 18 जून रोजी संध्याकाळी पायलटसमवेत 4 पर्यटकांना सोबत घेत टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी प्रवास सुरु केला होता, परंतु एक तास45 मिनिटांनी ही पाणबुडी रडारवरून बेपत्ता झाली होती. पाणबुडीत असलेल्या 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
दुर्घटनेतील मृतांमध्ये ब्रिटिश उद्योजक हॅमिश हार्डिंग, फ्रान्सचे डायव्हर पॉल-हेन्री, पाकिस्तानी-ब्रिटिश उद्योजक शहजादा दाऊद, त्यांचा पुत्र सुलेमान आणि ओशनगेट कंपनीचे सीईओ स्टॉकटॉन रश सामील आहेत. अमेरिकेच्या तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी संध्याकाळी याची पुष्टी दिली आहे, परंतु अद्याप संबंधितांचे मृतदेह हस्तगत झालेले नाहीत.

अटलांटि महासागरात पाणबुडीचे अवशेष रिमोटली ऑपरेटेड व्हेईकलद्वारे शोधण्यात आले. या पाणबुडीत विस्फोट झाला असण्याची शक्यता आहे. विस्फोट कधी झाला हे आताच सांगता येणार नाही. अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप शोधावी लागणार आहेत असे अमेरिकेच्या तटरक्षक दलाचे रिअल अॅडमिरल जॉन मॉगर यांनी म्हटले आहे.
ही पाणबुडी भारतीय प्रमाणवेळेनुसार 18 जून रोजी संध्याकाळी 5.30 वाजता अटलांटिक महासागरात सोडण्यात आली होती. त्यानंतर 7.15 वाजण्याच्या सुमारास पाणबुडीशी असलेले संपर्क तुटला होता. मागील 4 दिवसांपासून सुरू असलेली शोधमोहीम आता संपुष्टात आली आहे. या शोधमोहिमेत अमेरिका, कॅनडा, फ्रान्स आणि ब्रिटनची विमाने तसेच नौका सामील झाल्या होत्या.
पाणबुडीचे 5 हिस्से निदर्शनास
अवशेषांमध्ये 22 फूट लांब टायटन पाणबुडीचे 5 हिस्से दिसून आले ओत. यात टेल कोन आणि प्रेशर हलचे 2 सेक्शन सामील आहेत. कुठल्याही प्रवाशाचे अवशेष अद्याप हस्तगत झालेले नाहीत. रोबोट एअरक्राफ्ट अटलांटिक महासागरात सातत्याने अवशेष शोधत राहणार आहे. याद्वारे दुर्घटनेविषयी अधिक माहिती जमविण्याचा प्रयत्न केला जाईल असे मॉगर यांच्याकडून सांगण्यात आले.
रडारवर मिळाले विस्फोटाचे सिग्नल
टायटन पाणबुडीचा अंतिम ठावठिकाणा टायटॅनिक जहाजानजीकच नोंदला गेला होता. बेपत्ता झाल्याच्या काही वेळानंतर रडारवर विस्फोटाशी निगडित काही सिग्नल्स प्रापत झाले होते. ही माहिती त्वरित कमांडरसोबत शेअर करण्यात आली होती असे अमेरिकेच्या नौदलाच्या अधिकाऱ्याने सांगितले. विस्फोटानंतर पाणबुडीतील प्रवासी वाचण्याची शक्यता नसल्याचे तज्ञांकडून यापूर्वीच सांगण्यात आले होते. टायटॅनिक जहाजाचे अवशेष अटलांटिक महासागरात आहेत. हे कॅनडाच्या न्यूफाउंडलँडच्या सेंट जोन्सपासून 700 किलोमीटर अंतरावर आहेत. तसेच अवशेष अटलांटिक महासागरात 3800 मीटर खोलवर आहेत. पाणबुडीचा हा प्रवासही कॅनडाच्या न्यूफाउंडलँड येथूनच सुरू व्हायचा आणि 2 तासांच्या प्रवासानंतर पाणबुडी अवशेषांपर्यंत पोहोचत होती.









