वृत्तसंस्था / नवी दिल्ली
तिरुपतीच्या लाडू प्रसादात गाईच्या आणि डुकराच्या चरबीची भेसळ असल्याचा खळबळजक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे तिरुपतीच्या भक्तांच्या आणि एकंदरीतच हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. तथापि, तिरुपती तिरुमला देवस्थानचे माजी अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बारेड्डी यांनी या अहवालाला आक्षेप घेतला असून या अहवालाचीच चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.
याकरिता त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केली आहे. या अहवालाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अधिपत्यात समिती स्थापन करावी. या समितीचे नेतृत्व सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांनी करावे. या समितीने या अहवालाचा सखोल अभ्यास करून त्याच्या सत्यासत्यतेसंदर्भात निर्णय द्यावा, अशी मागणी सुब्बारेड्डी यांनी केली आहे. त्यांनी आरोपाचा इन्कारही केला.
माजी अधिकाऱ्यांकडून इन्कार
तिरुमला तिरुपती देवस्थान मंडळाचे आणखी एक माजी अध्यक्ष भूमाना करुणाकर रेड्डी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या आरोपांचा इन्कार केला आहे. तिरुपतीच्या प्रसादामध्ये ही भेसळ जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारच्या काळात करण्यात आली होती, असा त्यांचा आरोप आहे. तथापि, करुणाकर रेड्डी यांनी या आरोपाला तीव्र आक्षेप घेतला. देवस्थानची चाचणी यंत्रणा अतिशय बळकट आहे. हा लाडू प्रसाद जगभरात पोहचत असल्याने त्याची निर्मिती नियमांचे कठोर पालन करुनच करण्यात येते, असे त्यांचे म्हणणे आहे.
सरकारच्या भूमिकेकडे लक्ष
आंध्रप्रदेश सरकारच्या भूमिकेकडे आता साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. या सरकारने चौकशी समितीची स्थापना केली आहे. समिती कोणाची चौकशी करणार, माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची चौकशी केली जाणार आहे का, अनेक अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. समितीने लवकर तपास करावा आणि सत्य बाहेर आणावे. दोषींना त्वरित शासन करावे, अशी मागणी केली जात आहे.









