ख्रिश्चन धर्मीयाची नियुक्ती : तेदेपकडून आक्षेप
वृत्तसंस्था/ तिरुपति
देशातील सर्वात श्रीमंत मंदिर तिरुपतिच्या व्यवस्थापन मंडळाच्या अध्यक्षपदी आमदार करुणाकर रे•ाr यांची नियुक्ती करण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. करुणाकर रेड्डी यांचे कुटुंब हे ख्रिश्चन धर्माला मानणारे आहे. या पार्श्वभूमीवर आंध्रप्रदेश सरकारच्या या निर्णयावर तेलगू देसम पक्ष तसेच भाजपने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
हिंदू धर्मावर श्रद्धा नसलेल्या व्यक्तीला मंदिर व्यवस्थापन मंडळाच्या अध्यक्षपदी कसे नेमले जाऊ शकते? रेड्डी हे ख्रिश्चन धर्म मानणारे असून त्यांचे ख्रिश्चनधर्मीयांशी संबंध आहेत. त्यांच्या मुलीचा विवाह ख्रिश्चन पद्धतीने झाला होता असा दावा तेदेपचे नेत बुच्ची राम प्रसाद यांनी केला आहे.

भाजपकडूनही टीका
हिंदू धर्मावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीलाच या पदावर नियुक्त करणे गरजेचे आहे. सरकारचा निर्णय पाहता या पदाचा सरकार राजकीय लाभासाठी वापर करत असल्याचे सिद्ध होत असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष डी. पुरंदेश्वरी यांनी केली आहे. तिरुपति बोर्डात कार्यकारी अधिकारी राहिलेले भाजप नेते आय.वाय.आर. कृष्णा राव यांनीही सरकारच्या निर्णयाला चुकीचे ठरविले आहे. टीटीडी ट्रस्ट बोर्डचे अध्यक्षपद राजकीय नियुक्ती ठरल्याचा प्रकार दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राज्य सरकारकडून बचाव
राज्यातील सत्तारुढ पक्ष वायएसआर काँग्रेसने सरकारच्या निर्णयाला योग्य ठरविले आहे. करुणाकर रेड्डी यांच्या धार्मिक आस्थेवरुन कुठलाच वाद नाही. विरोधी पक्ष विनाकारण हा वाद निर्माण करू पाहत आहेत. तिरुपतीचे लोक करुणाकर रेड्डी आणि त्यांच्या धर्माविषयी सर्व जाणून आहेत असा दावा पक्षाचे आमदार श्रीकांत रेड्डी यांनी केला आहे.
दुसऱ्यांदा ट्रस्टच्या अध्यक्षपदी
करुणाकर रेड्डी हे 10 ऑगस्ट रोजी तिरुमला तिरुपति देवस्थानम ट्रस्ट बोर्डाचे अध्यक्षपद स्वीकारणार आहेत. रेड्डी हे दुसऱ्यांदा हे पद भूषविणार आहेत. विद्यमान मुख्यमंत्री जगनमोहन रे•ाr यांचे वडिल वाय.एस. राजशेखर रेड्डी हे आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री असताना म्हणजेच 2006-08 दरम्यान करुणाकर रेड्डी हे या ट्रस्टचे अध्यक्ष होते. करुणाकर रेड्डी हे वायएसआर कुटुंबाचे कट्टर समर्थक आहेत. यापूर्वी ते जगनमोहन रेड्डी यांच्यासोबत काँग्रेसमध्ये होते. जगनमोहन यांनी वडिलांच्या मृत्यूनंतर काँग्रेसला रामराम ठोकून वायएसआर काँग्रेस स्थापन केल्यावर करुणाकर रेड्डी ही त्यात सामील झाले होते. माझे कुटुंब ख्रिश्चन धर्माचे पालन करते, परंतु मी हिंदू धर्म मानतो असे करुणाकर रेड्डी यांचे सांगणे आहे.
देशातील सर्वात मंदिर
तिरुपति येथली श्री व्यंकटेश्व़र मंदिर देशातील सर्वात श्रीमंत मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिराकडे 2.5 लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. यात 10.25 टन सोने आणि 3 हजार कोटी रुपयांची वार्षिक कमाई सामील आहे. दरवर्षी दानपेटीत भाविकांकडून 1500 कोटी रुपये जमा होत असतात.









