आनंदनगर-वडगाव येथील महिलेच्या सावकारी व्यवसायामुळे खळबळ
बेळगाव : सावकारी पाशाला कंटाळून दत्त गल्ली, वडगाव येथील महिलेने विष प्राशन केल्याने एकच खळबळ उडाली आहे. आनंदनगर, वडगाव येथील सावकारी व्यवसाय करणाऱ्या एका महिलेने तिच्याकडून दिलेल्या रकमेपेक्षा तीनपट रक्कम घेतली. तरीदेखील अजूनही व्याज देणे बाकी आहे म्हणून तिला विविध मार्गाने मानसिक त्रास दिल्याने त्या महिलेने शुक्रवारी विषप्राशन केले. तातडीने तिला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सुधा महेश करबस्ती (वय 29) असे त्या विष प्राशन केलेल्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. सुधा हिने आनंदनगर, वडगाव येथील महिलेकडून काही रक्कम घेतली होती. त्या बदल्यात तब्बल सात लाख रुपये सावकारी करणाऱ्या महिलेने घेतल्याचा आरोप देखील तिचा पती महेश यांनी केला आहे.
रक्कम घेताना दहा धनादेशदेखील घेण्यात आले आहेत. याचबरोबर 18 ग्रॅम सोनेदेखील त्या सावकारी व्यवसाय करणाऱ्या महिलेने घेतले आहे, असे पतीने यावेळी सांगितले. 10 टक्के व्याजाने ही रक्कम देण्यात आली आहे. आम्ही आजपर्यंत अधिक व्याज दिले. मात्र, अजूनही तुम्ही रक्कम देणे आहे म्हणून त्यांच्यावर दबाव घालण्यात आला. या जाचाला कंटाळून सुधा हिने विष प्राशन केले आहे. सदर महिलेला तातडीने उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. रात्री उशिरापर्यंत शहापूर पोलीस स्थानकामध्ये फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलीस अधिक चौकशी करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. एकूणच या प्रकारामुळे आनंदनगर व वडगाव परिसरात खळबळ उडाली आहे. अजूनही सावकारी पाशामध्ये जनता असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून असा व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.









