ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मी पक्षात नाराज नाही. सध्याच्या राजकारणाचा कंटाळा आल्यामुळे दु:खी आहे. त्यामुळे मला राजकारणातून थोडा ब्रेक हवा आहे. मी दोन महिने सुट्टीवर जात आहे, असे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. दरम्यान, भाजपमधून मी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. मुंडे म्हणाल्या, मी पक्षाच्या विरोधात कधीही गेले नाही. तरी देखील माझ्या नैतिकतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मी पक्षात नाराज असल्याचे सांगितले जाते. मी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे सांगितले जाते. नुकतेच यासंदर्भातील वृत्त एका वृत्तवाहिनीने दिलं. त्यामध्ये मी राहुल गांधी आणि सोनिया गांधींची भेट घेतल्याचे सांगण्यात आलं. माध्यमांकडून अशा प्रकारचे चुकीचे वार्तांकन अपेक्षित नाही. ही बातमी दाखवणाऱया संबंधित वृत्तवाहिनीवर मी मानहानीचा दावा दाखल करणार आहे.
मी शपथेवर सांगते, सोनिया गांधी यांना मी ओळखतही नाही. भाजप सोडून मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. माझं करिअर कवडीमोलाचं नाही. पाठीत खंजीर खुपसण्याचं रक्त माझ्या अंगात नाही. गेल्या 20 वर्षांपासून मी सुट्टी घेतलेली नाही. मला एक दोन महिन्यांच्या सुट्टीची आवश्यकता आहे. मलाही विचार करण्याची आवश्यकता आहे. आमदार झाले तेव्हा मुलाखतीमध्ये मी म्हटलं होतं की, राजकारणात जी विचारधारा डोळय़ासमोर ठेवून आले, त्याच्याशी प्रतारणा करावी लागेल. तेव्हा राजकारणातून बाहेर पडताना मागे पुढे पाहणार नाही. आताच्या परिस्थितीमध्ये मला ब्रेकची आवश्यकता आहे. तो मी घेणार आहे.