अथणी पोलिसांकडून अडीच लाखाचे टायर हस्तगत

प्रतिनिधी /बेळगाव
थांबलेल्या टिप्परचे टायर चोरल्याच्या आरोपावरून अथणी पोलिसांनी अनंतपूर, ता. अथणी येथील एका युवकाला अटक केली आहे. त्याच्याजवळून चोरीचे सहा टायर व चोरीसाठी वापरण्यात आलेले थंडर मालवाहू वाहन जप्त करण्यात आले आहे.
जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी ही माहिती दिली आहे. अथणीचे पोलीस उपअधीक्षक श्रीपाद जलदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र नायकोडी, उपनिरीक्षक शिवशंकर मुक्री, राकेश बगली व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
कुमार दशरथ थैलार, रा. अनंतपूर असे त्याचे नाव आहे. रविवारी त्याला अटक करण्यात आली. एक महिन्यापूर्वी अथणी येथील कृष्णा वसाहतीत असलेल्या राजू अलबाळ यांच्या काँक्रिट मिक्सिंग प्लांटमध्ये उभ्या केलेल्या टिप्परचे सहा टायर चोरण्यात आले होते. त्यांची किंमत 2 लाख 40 हजार रुपये इतकी होते.
एमएच 09, ईएम 0104 क्रमांकाच्या थंडर मालवाहू वाहनाचा चोरीसाठी वापर करण्यात आला होता. पोलिसांनी हे वाहन जप्त केले आहे. जत-जांबोटी रोडवरील अनंतपूरजवळ कुमारला अटक करण्यात आली असून अटकेची प्रक्रिया पूर्ण करून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.









