ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पंजाबमधील सरकारी कार्यालये उघडण्याची वेळ बदलण्यात येणार आहे. सकाळी 7.30 ते दुपारी 2 या वेळेत सरकारी कार्यालये सुरू राहतील. हा बदल केवळ 2 मे ते 15 जुलै या कालावधीसाठी करण्यात आला आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
भगवंत मान म्हणाले, सध्या उन्हाळयाचे दिवस आहेत. पीएसपीसीएलने सरकारला सांगितले आहे की, पीक लोड दुपारी 1.30 ते 5 वाजेपर्यंत चालतो. सरकारी कार्यालये दुपारी 2 वाजता बंद झाल्यास सर्व पंखे, बल्ब, कुलर, एसी बंद होतील. त्यामुळे पीक लोड 300 मेगावॅटवरून 350 मेगावॅटपर्यंत कमी होईल. परदेशात ही पद्धत अवलंबली जाते. याच धर्तीवर आपण सरकारी कार्यालयांच्या वेळेत बदल करत आहोत.
सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी लोकांशी चर्चा केली आहे. कर्मचाऱ्यांनीही या निर्णयाला संमती दर्शवली आहे. दुपारी उष्णता वाढण्यापूर्वीच लोकांना आणि कर्मचाऱ्यांना आपली कामे आटोपून घरी परतता येईल.









