पुणे / प्रतिनिधी :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांसाठीही सध्याचा काळ कसोशीचा असल्याची प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankja Munde) यांनी पिंपरीत व्यक्त केली.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी त्या शहरात आल्या होत्या. त्या वेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. मुंडे म्हणाल्या, या सगळय़ा राजकीय परिस्थितीकडे मी कुतूहल म्हणून पाहते. माझे प्रत्येकाशी माझे जिव्हाळय़ाचे संबंध आहेत. पण मला एवढचे म्हणायचे आहे, की आत्ता जो काळ आहे तो सर्वांसाठी कसोशीचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक कार्यकर्ताही पक्षाचे नेतृत्व करू शकतो, हा नवा संदेश दिला आहे. मात्र, तो यशस्वी करणे आणि त्यांच्यासोबत असणारे सर्व लोक निवडून आणणे, हे आव्हान आहे. ही कामगिरी करण्याची त्यांच्यासमोर संधी आहे.
अधिक वाचा : शिवसेना भवन वा कोणत्याही मालमत्तेवर दावा करणार नाही
दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठी आव्हाने असतील. शिवसेना पक्षाचे नाव नसताना पक्ष उभा करून त्यांना दाखवावा लागेल. बहीण म्हणून आपण उद्धव ठाकरे यांच्याशी बोलला आहात का, असा प्रश्न पंकजा मुंडे यांना विचारला असता त्या म्हणाल्या, जे बहीण म्हणून बोलायचे आहे, ते तुमच्यासमोर कशाला सांगू? खरे तर त्यांना सल्ला द्यावा, इतकी मोठी मी नक्कीच नाही. मी लहान बहीण आहे, असे उत्तर त्यांनी दिले.
कुणी निवडणुकीच्या रिंगणात उभे रहायचे वा रहायचे नाही, हा विषय आता मागे पडला आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी सगळय़ांची इच्छा होती. पण आता उमेदवार रिंगणात उतरले आहेत, तर लढाई होणारच, असेही मुंडे यांनी म्हणाल्या.








