कोल्हापूर :
काहीवेळा समज–गैरसमजामुळे गर्भवती महिलांची रूग्णालयात उशिरा नाव नोंदणी केली जाते. प्रेग्नन्सीनंतर पहिल्या महिन्यातच नाव नेंदणी करून नऊ महिन्याच्या कालावधीत आवश्यक सर्व प्रसुतीपूर्व तपासण्या वेळेत केल्यास सुलभ प्रसुतीतील येणाऱ्या अडचणी दुर होत असल्याचे प्रसुती तज्ञांनी सांगितले. उशिरा नाव नोंदणीमुळे माता व शिशुच्या निदानामध्ये मर्यादा येऊन प्रसुतीवेळी गुंतागुंतीची स्थिती निर्माण होण्याची शक्यता प्रसुती तज्ञांनी व्यक्त केली आहे.
गर्भवती महिलांची वेळेत नाव नोंदणी केल्याने महिलांचे पार्श्वभुमीचे आजार, रक्ताची कमतरता, विटामीनची कमतरता, रक्त–लघवीतील दोष, ब्लड प्रेशर, गर्भातील बाळाची स्थिती व आजार, मधुमेहांवर नियंत्रण मिळवता येते. बऱ्याच गर्भवती महिला व त्यांच्या कुटूंबीयांकडून विविध हॉस्पिटलमध्ये नाव नोंदणी करतात. एका रूग्णालयात नाव नोंदणी करून दुसऱ्या दवाखान्यात उपचारासाठी गेल्यास डॉक्टरांना गर्भवती महिलेची पार्श्वभुमी समजुन घेण्यात उशिर लागतो. त्यामुळे प्रसूतीवेळी धावाधाव करावी लागते.
केंद्र व राज्य शासनाच्या सर्व शासकीय रूग्णालयांमध्ये जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, माझी कन्या भाग्यश्री योजनांच्या माध्यमातून गर्भवती महिलांची 9 महिन्यातील सर्व तपासण्या मोफत केल्या जतात. तपासणी दरम्यान रक्तवाढ, लोह, विटामीन्सची औषधे, प्रवासाचा खर्च, 1 सोनोग्राफी, अॅम्ब्युलन्सने घरी सोडण्याची व्यवस्था, प्रसुतीपूर्व व प्रसुती पश्चात मोफत रक्त पुरवठा आदी सुविधा दिल्या जातात. त्यामुळे प्रेग्नन्सीनतंर पहिल्याच महिन्यात वेळेत नाव नोंदणी करून सुलभ व सुरक्षित प्रसुतीचा लाभ घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
- नाव नोंदणी म्हणजे नेमके काय..?
प्रेग्नन्सीनंतर काहीवेळा तिसऱ्या, पाचव्या, सातव्या महिन्यात विविध दवाखान्यात नाव नोंदणी केली जाते. ही पद्धत चुकीची असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. प्रेग्नन्सीनंतर पहिल्या महिन्यातच नाव नोंदणी करून आवश्यक तपासण्या करणे गरजचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. प्रेग्नन्सीपासून 9 महिने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य त्या सर्व तपासण्या करणे आवश्यक आहेत. गर्भवतींची नाव नोंदणी म्हणजे कुठेही व केंव्हाही असा नसुन 9 महिन्याच्या काळातील आवश्यक सर्व तपासण्या, बाळाची वाढ, औषधे, गर्भसंस्कार, आहाराचा योग्य समावेश आदी बाबींकडे कटाक्षाने लक्ष असा अर्थ होतो.
- नाव नोंदणीची प्रक्रीया :
नाव नोंदणी वेळी : माता आणि बाल संरक्षण कार्ड व सुरक्षित मातृत्व पुस्तिका दिली जाते. गर्भवती महिलेची उंची, वजन, नाडी व रक्तदाब तपासून निष्कर्ष नोंदविले जातात. हिमोग्लोबिन, लघवीतील अल्ब्युमिन व साखर, मलेरिया, व्हीडीआरएल, एचआयव्ही, रक्तगटीकरण, ओजीटीटी वापरून जीडीएमची तपासणी केली जाते.
अल्ट्रासोनोग्राफी (ळएउ) : शासकीय रूग्णालयात नोंदणी केलेल्या महिलांची प्रसूतीतज्ञ, वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मोफत तपासणी केली जाते. तपासणीमध्ये ‘उच्च धोका’ (हाय रिस्क) असलेल्या महिलांच्या माता, बाल संरक्षण कार्डवर लाल स्टिकर, स्टॅम्प जोडला जातो. गर्भवती महिलांना नऊ महिन्यातील आहार, झोप, नियमित तपासणी, संस्थात्मक प्रसूती, स्तनपान, आदी बाबत समुपदेशन केले जाते.
- पहिल्या महिन्यात नाव नोंदणी आवश्यकच
प्रेग्नन्सीनंतर पहिल्याच महिन्यात नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. वेळेत नाव नोंदणीने 9 महिने सर्व तपासण्या व उपचार घेतल्याने नैसर्गिक व सुलभ प्रसुतीसाठी फायदा होतो. 9 महिन्यातील सर्व तपासण्या व औषधोपचार शासकीय रूग्णालयांमध्ये मोफत असुन याचा लाभ घ्यावा. अनेकवेळा विविध कारणांमुळे गर्भवती महिलांची नाव नोंदणी उशिरा केली जाते. काही महिलांच्या कुटूंबियांकडून अनेक दवाखान्यात नावनोंदणी केली जाते. ही पद्धत चुकीची आहे.
डॉ. विद्या काळे, पंचगंगा हॉस्पिटल विभाग प्रमुख








