बेनकनहळ्ळीजवळ रस्त्यावरील खड्डय़ांकडे दुर्लक्ष : वाहनधारकांची तारेवरची कसरत : तातडीने दुरुस्तीची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगुंदीनजीक झालेल्या अपघातात तरुणाचा बळी गेला आहे. अशाप्रकारचे अपघात होण्यास ग्रामीण भागातील रस्ते कारणीभूत असल्याची चर्चा होत आहे. रामघाट रोड म्हणून ओळखल्या जाणाऱया राकसकोप रस्त्याची दुर्दशा झाली असून बेनकनहळ्ळी जवळील रस्त्यावर मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्मयता आहे.
रामघाट रोडची सध्या देखभाल करण्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे ठिकठिकाणी खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. विशेषतः ज्योतीनगरपासून राकसकोपपर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. खड्डे चुकविण्याचा प्रयत्न वाहनधारक करीत असल्याचे नेहमीच निदर्शनास येते. परिणामी अपघात घडतात. रामघाट रोड रस्ता सध्या खूपच धोकादायक बनला असून शिवमनगर ते पेंबाळी नाल्यापर्यंतच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने वाहने कशी चालवायची? असा प्रश्न वाहनधारकांसमोर निर्माण झाला आहे.
या रस्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. बेनकनहळ्ळी परिसरात अन्न व नागरी पुरवठा खात्याचे गोडावून असल्याने अवजड वाहनांची वाहतूक दररोज होत असते. त्यामुळे येथील रस्ते दुचाकी आणि लहान चारचाकी वाहनधारकांना धोकादायक बनले आहेत. ठिकठिकाणी एक फुटापेक्षा अधिक खोलीचे खड्डे निर्माण झाल्याने दुचाकी वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा बनले आहेत. या खड्डय़ांमधून वाहने चालविताना दुचाकी वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. पावसाचा जोर वाढल्याने खड्डय़ांमध्ये सतत पाणी साचून राहत आहे. त्यामुळे खड्डय़ांची खोली वाहनधारकांच्या लक्षात येत नाही. परिणामी वाहनांचे अपघात घडत आहेत. येथील खड्डय़ांची दुरुस्ती करावी, अशी मागणी सातत्याने करण्यात आली होती. पण सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे कानाडोळा केला आहे.
बेनकनहळ्ळी परिसरातील रस्ता अपघातास निमंत्रण देत असून या ठिकाणी वाहनधारकांचा बळी गेल्यानंतरच खड्डय़ांची दुरुस्ती करणार का? अशी विचारणा नागरिक करीत आहेत. येथील रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी होत आहे.